छत्रपती शिवाजी महाराजांची कौशल्यपूर्ण रणनीती जगजाहीर आहे. आपल्या देशात शिवाजी महाराजांच्या रणनीतीला म्हणावा तसा आदर दिला गेला नसला तरी काही देश त्यांची रणनीती अजूनही वापरतात. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतर गेल्या काही वर्षात ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा शब्दप्रयोग प्रचलित झाला आहे. परंतु इतिहासात अशा प्रकारचे अनेक सर्जिकल स्ट्राईक्स महाराजांनी केले आहेत याची नोंद मिळते. इतिहासाच्या पानांत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या काही अशा युद्धनीतींचा उल्लेख आहे त्याचं खरंतर शब्दांत वर्णन करणं शक्य नाही. त्यांच्या ‘गनिमी कावा’ तंत्राचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून.
कमीतकमी वेळात प्रतिपक्षाची अधिकाधिक हानी हे महारांजांच्या गनिमी काव्याचे तंत्र होते. धैर्य आणि युक्ती याचा सुयोग्य वापर करीत युद्धनेतृत्व करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या सैन्याचे चैतन्य होते. ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दिले. मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गनिमी काव्याचा वापर करत अनेक सर्जिकल स्ट्राइक घडवून आणले होते. पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानावर शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेला हल्ला हा अतिशय अचाट कौटिल्यपूर्ण असाच होता. लालमहालात शिरून शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच.
शाहिस्तेखानाच्या धुमाकूळात स्वराज्यातील रयत भरडून निघत होती. महाराजांनी आपल्या विश्वासू मंडळींबरोबर विचारविनिमय करून शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करण्याची योजना पक्की केली. शिवाजी महाराज लालमहालात अतिशय शिताफीने शिरले. शाहिस्तेखानाची धांदल उडवून दिली. या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाला याचा मोठा हादरा बसला. लढाईच्या वेळी सैन्याच्या अग्रस्थानी राहण्याचे धाडस दाखवत धोका पत्करणारे छत्रपती शिवाजी महाराज उत्तम सेनापती होते त्याची प्रचीती, तसेच रमजान महिन्याचा मुहूर्त साधत या हल्ल्याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी आखली याचा थरार ‘स्वराज्यजननी जिजामाता’ दिसेल.
डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयातून शिवरायांचे अनोखे रूप प्रेक्षकांसमोर उलगडले आहे. या विशेष भागाच्या चित्रीकरणादरम्यान डॉ. अमोल कोल्हे हे दुखापतग्रस्त झाले. सुप्रसिद्ध 'स्टंट मास्टर' रवी दिवाण यांनी या विशेष भागाची साहस दृश्ये साकारली आहेत.
हाच सगळा थरार सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या विशेष भागातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. महाराजांच्या युद्धकौशल्याची झलक दाखवणारे ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतील हे विशेष भाग सोनी मराठीवर सोमवार २८ जून ते बुधवार ३० जून दरम्यान रात्रौ ८.३० वा. पहाता येतील.
हेही वाचा - HBD : सई ताम्हणकर आणि करिष्मा कपूर यांच्या प्रकट दिनानिमित्त.....