‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका म्हणजेच दिलदार प्रेमाची ही वजनदार गोष्ट बघता बघता अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका अतिशय नाजूक विषयावर आधारलेली असून या मालिकेद्वारे लठ्ठपणाचा मुद्दा अत्यंत हळूवारपणे हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक काळातही मुलींच्या वाट्याला बाह्यरूपामुळे नकार येतो. या मालिकेमुळे लोकांचा सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला कुठेतरी हळूहळू सुरुवात होईल अशीच इच्छा आहे.
आपल्या समाजातील वेगळं भावविश्व दाखवणारी, सुंदर असणं म्हणजे नक्की काय, याचा पुन्हा एकदा विचार कारायला भाग पाडणारी सुंदरा म्हणजेच लतिका महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये भरली, प्रेक्षकांनी मालिकेला उदंड प्रतिसाद दिला आणि अजूनही देत आहेत. आता हीच ‘सुंदरा’ झालीय एका वर्षाची. थोडक्यात सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची “वर्षपूर्ती” झाली आहे.
क्षणात मनामध्ये भरते ते रूप, सहवासाने भरते ते स्वरूप. अगदी असंच या मालिकेमध्ये होताना दिसू लागलं आहे. अभिचं मन सुंदराने म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या लतिकाने जिंकलं आहे ते तिच्या समजूतदारपणामुळे आणि स्वभावामुळे. पण, लतिका अभिचं प्रेम स्वीकारेल की नाही हे जाणून घेण्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुर आहे. मालिकेतील सगळ्याच पात्रांनी म्हणजेच लतिका, अभिमन्यू, इंदू, सज्जनराव, दौलत, बापू (लतिकाचे वडील), लतिकाची आई, मिस नाशिक, हेमा, आशुदादा संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली. मधुगंधा कुलकर्णी यांनी अतिशय सुंदररित्या कथेची मांडणी केली आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती स्ट्रॉबेरी पिक्चर्सने (मनवा नाईक) केली आहे.
आता मालिकेमध्ये नंदिनी नावाच्या पात्राची नुकतीच एंट्री झाली आहे ही भूमिका अदिति द्रविड साकारत आहे. तिच्या येण्याने मालिकेमध्ये पुढे काय होईल? बापूंमुळे लतिका व अभिमन्यूची मैत्री अडचणीत आली आहे, पुढे काय होईल मालिकेत? नंदिनीच्या येण्याने अभि आणि लतिका एकत्र येतील? हे जाणून घेण्यासाठी बघत राहावी लागेल ‘सुंदरा मनामध्ये भरली’ जी प्रसारित होते सोम ते रवि रात्री ९.०० कलर्स मराठीवर.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचे दिग्दर्शक, पडद्यामागची संपूर्ण टिम खूप कष्टाने हे काम करते आहे त्या सगळ्यांना ‘वर्षपूर्ती’ निमित्त निर्मात्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - सायरा बानू यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुन्हा अँजिओग्राफीसाठी दाखल करणार