मुंबई - 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेमधील अनु आणि सिध्दार्थची जोडी बघता बघता अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली. या दोघांच्या सुख दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली. प्रेक्षक या दोघांचे लग्न कधी होईल याची वाट आतुरतेने पाहात होते आणि अखेरीस तो क्षण आला, अनु - सिद्धार्थचा विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. या दोघांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला.
या सगळ्यामध्ये आता मालिकेने ३०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही. या मालिकेतील सगळ्या कलाकारांनी, मालिकेच्या संपूर्ण यूनिटने हा क्षण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला.
केक कापत आणि सेल्फी काढत त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी मालिकेतील मुख्य अभिनेता शशांक केतकर, अभिनेत्री मृणाल दुसनिस यांच्यासह संपूर्ण टीम हजर होती. या सगळ्यांनी मिळून हा अविस्मरणीय क्षण जपून ठेवण्यासाठी खास फोटोसेशनही केलं.