मुंबई - 'जिंगल बेल.. जिंगल बेल'चे स्वर सगळीकडे घुमायला लागलेत कारण नाताळचा सण आला आहे. याच सणासाठी मुंबईतील जुनी चर्च देखील अतिशय सुंदररीत्या सजवण्यात आलेली आहेत. त्यातीलच एक म्हणजे मुंबईतील कुलाब्याचे वुडहाऊस चर्च..
मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांच्या मांदियाळीत देखील आपली शांत ओळख जपलेलं हे चर्च कुलब्यामध्ये वसलेलं आहे. आधी हे चर्च म्हणजे एक छोटासा किल्ला होता. मात्र, नंतर इंग्रजांनी त्याचं चर्चमध्ये रूपांतर केलं. 1776 साली किल्ल्याचे याच चर्चमध्ये रूपांतर झाल्याचे दाखले इथे पहायला मिळतात.
या चर्चचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या छताकडे भगवान येशूच्या जीवनप्रवास मांडणारी चित्र रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे या चर्चला हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे. अशाप्रकारे चित्र असणारी दोनच चर्च संपूर्ण भारतात आहेत. त्यातील एक मुंबईतील कुलब्यात आहे तर दुसर कर्नाटकातील मंगलोर येथे आहे.
सध्या नाताळच्या सणानिमित्त हे चर्च अतिशय सुंदररीत्या सजवण्यात आलं आहे. जागोजागी विजेच्या माळा, आकर्षक स्टार्स आणि इतर रोषणाईमुळे हे चर्च अतिशय सुंदर दिसत आहे. चर्चच्या अंतर्गत भागात येशूजन्माचा छान देखावा उभारण्यात आलेला आहे. नाताळच्या मध्यरात्री मिडनाईट मास म्हणजेच मध्यरात्रीच्या प्रार्थना सभेच आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर छान मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसरात हे चर्च असल्याने अनेक मान्यवर मंडळी येथे प्रार्थना करण्यासाठी येतात.
विशेष म्हणजे अनेक मान्यवर मंडळींनी या चर्चला भेट दिलेली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही त्यांच्या भारत भेटीदरम्यान या चर्चला भेट दिली होती. त्यामुळे या चर्चला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरवर्षी येणाऱ्या नाताळचा सण या चर्चमध्ये अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. ईश्वराची मनोभावे आराधना करण्यासाठी यावर्षी देखील कुलब्यातील हे 'वुडहाऊस चर्च' सज्ज झालेलं आहे.