जालना - महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्टँड अप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जालन्यातील ३१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून पु.लंच्या साहित्यावर आधारित एक पात्री अभिनय सादर केला.
शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या या एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये पु लंचे असामी -असामी, नारायण, चितळे मास्तर, ती फुलराणी, मी आणि माझा शत्रुपक्ष, असे विविध एकपात्री अभिनय करून हास्याचे फवारे उडविले. आज झालेल्या या स्पर्धेमध्ये सतीश शिंगडे याने पहिला तर संदीप शिंदे याने दुसरा क्रमांक पटकाविला.
रोख २० हजार आणि १५ हजार रुपये बक्षीस त्यांना देण्यात आले. रोहित देशमुख, रमाकांत भालेराव, राजू सोनवणे या स्पर्धेचे परीक्षक होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर काबरा यांच्यासह डॉ. यशवंत सोनूने, डॉ. केजी सोनकांबळे, डॉ. महावीर सदावर्ते, डॉ.प्रदीप चंदनशिवे , डॉ.हेमंत वर्मा, डॉ. आनंद कुलकर्णी, डॉ.लक्ष्मण कदम या प्राध्यापकांनी सहकार्य केले.