मुंबई - लॉकडाऊननंतर नवीन मालिकांची निर्मिती सुरू झाली. मात्र काही मोजक्याच मराठी मालिकांवर प्रेक्षकांकडून पसंतीची मोहोर उमटवली गेली. त्यातील एक मालिका म्हणजे ‘श्रीमंताघरची सून'. सोनी मराठीवरील या मालिकेतील अथर्व आणि अनन्या या जोडीनी थोड्याच काळात चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा पहिल्या भेटीपासून आत्तापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. श्रीमंताघरची मुलगी आणि मध्यम घरातला मुलगा यांची हळुवार फुलत जाणारी प्रेम कहाणी या मालिकेत पाहायला मिळते आहे.
हेही वाचा - ''अजिंक्य रहाणेच्या संघाने...'', पवांरानी केले टीम इंडियाचे कौतुक
आधीच घरात असलेल्या श्रीमंताघरच्या दोन सुनांचा कटू अनुभव घेतल्यामुळे धाकटी सून श्रीमंताघरची आणायची नाही, असा निश्चय अरुणाने केला आहे. पण अथर्व ज्या अनन्याच्या प्रेमात पडला आहे, ती श्रीमंताघरची मुलगी आहे. एवढेच नाही तर ती अथर्वच्या बॉसची मुलगी आहे. अनन्याच्या आईला मात्र तिचे लग्न श्रीमंत घरात लावून द्यायचे आहे.
अथर्व आणि अनन्या यांच्या घरातल्यांनी त्यांचे लग्न ठरवले आहे, पण त्यांना कोणीच वेगळे करू शकत नाही. म्हणूनच घरातल्यांचा विरोध पत्करून त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला आहे. ही दोघे कसे लग्न करतील, त्यात काय अडथळे येतील, त्यांच्या लग्नाचा स्वीकार त्यांच्या घरातले करतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे २४ जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत.
‘श्रीमंताघरची सून' - लग्नसोहळा विशेष महाएपिसोड, २४ जानेवारी संध्या. ७ वा, सोनी मराठीवर संपन्न होईल.