मुंबई - उत्तरेकडील हिंदी भाषिक प्रेक्षकांत एक मराठमोळे नाव प्रकर्षाने आवडले जाते. ते म्हणजे अभिनेत्री शुभांगी अत्रे. त्या हिंदी-बेल्टमध्ये शुभांगीचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. टीव्हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है' मधील अंगूरी भाभी उर्फ शुभांगी अत्रे महिला सबलीकरणाची पाठीराखी आहे. निरागस अंगूरी भाभी साकारतानाचा अनुभव कथित करताना ती म्हणाली, ‘अंगूरी ही कानपूरमधील साधी-भोळी, सुसंस्कृत-पारंपारिक व निरागस महिला आहे. अंगूरी ही माझ्या जीवनातील सर्वात लक्षणीय भूमिका राहिली आहे. मी ही भूमिका साकारण्याचा पूर्णपणे आनंद घेत आहे. या भूमिकेमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली आहे आणि घराघरामध्ये माझी ओळख निर्माण झाली आहे. मला इतके प्रेम व प्रशंसा मिळण्याचा खूप आनंद होत आहे. पण, वास्तविक जीवनात मी अंगूरीसारखी नाही.
शुभांगीने पुढे सांगितले की तिच्यासाठी प्रेरणादायी अभिनेत्री म्हणजे वहिदा रहमान आणि शर्मिला टागोर. ‘वहीदा रेहमान आणि शर्मिला टागोर या दोन महिलांकडे मी नेहमीच माझे आदर्श म्हणून पाहते. त्या माझ्याप्रमाणेच अनेक अभिनेत्रींच्या प्रेरणास्रोत आहेत. मला प्रभावित केलेली सर्वात महत्वाची महिला म्हणजे माझी आई. मी आज जी कोणी आहे, त्यासाठी नेहमीच तिची कृतज्ञ राहीन. आजच्या पिढीमधील अभिनेत्रींमध्ये मला अनुष्का शर्मा खूप आवडते. ती एक निश्चयी महिला आहे जिने तिच्या कार्यामधून स्वत:चे महत्त्व स्थापित केले आहे.’
शुभांगीच्या मते महिला दिवस केवळ शहरी भागांपुरता वा ऑफिस महिलांपुरते नको राहायला. अनेक अशहरी भागातील महिला तसेच श्रमजीवी महिलांच्या समस्यांकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. ‘कोविड-19 मुळे जगभरातील जीवन बदलून गेले असताना उच्च-मध्यमवर्गीय श्रमजीवी महिलांना आपले काम आणि जीवनमान यामध्ये संतुलन राखण्यासंदर्भात अधिक समस्यांचा सामना करावा लागला. घरातील कामांसोबत व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या तणावामुळे महिलांवर अतिरिक्त ताण आला’, असे शुभांगी मानते. ती पुढे व्यक्त झाली, ‘महिला एकाचवेळी अनेक भूमिका निभावत असतात आणि कोरोना काळात त्यांनी बिनदिक्कतपणे आपापल्या कुटुंबीयांची देखभाल केली. चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या मेहनतीला सर्वांनी सलाम केला. महिलांना दिवसरात्र काम करावे लागले, कुटुंबाची, विशेषत: घरीच असण्यासोबत ऑनलाइन शिक्षण घेत असलेल्या मुलांची काळजी घ्यावी लागली, तसेच त्यांच्या व्यावसायिक जबाबदारीकडे देखील लक्ष द्यावे लागले. विशेषत: आरोग्यसेवा विभागामध्ये प्रत्यक्ष आघाडीवर काम करणाऱ्या बहुतांश कर्मचारी महिला आहेत. जग महामारीपासून सावरण्याचा प्रयत्न करत असताना महिलांची भूमिका अधिक समान असण्यासाठी आणि त्यांना अधिक संधी देण्यासाठी सहयोगात्मक पावले उचलणे आवश्यक आहे.’
कोरोनामुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी मोडली. साहजिकच आपल्या देशावर व लोकांवर याचा परिणाम झाला. शुभांगी तिच्या सामाजिक आणि अर्थ चक्राबद्दल बोलताना म्हणाली, ‘माझंच कशाला सर्वांनाच आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करण्यास मिळाला व आपण पूर्वी करू न शकलेल्या काही गोष्टी करण्यास देखील वेळ मिळाला. मी माझ्या आवडी आणि शारीरिक व मानसिक आरोग्यावर फोकस करणे सुरूच ठेवले. मी स्वत:ला तंदुरूस्त, उत्साही व आरोग्यदायी ठेवण्यासाठी चिंतन, योगासोबत नृत्याचा सराव केला. माझी कुत्म्बासमवेत वेळ व्यतित करण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली. लॉकडाऊनदरम्यान माझी मुलगी व मी चित्रकला व हस्तकलेसह बेकिंगमध्ये एकत्रितपणे या क्षणांचा आनंद घेतला. माझ्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी व्हिडिओज बनवले वसोशल मीडियावर लाइव्ह कथ्थक देखील शिकवले. या महामारीदरम्यान मी आपल्या जीवनाचा भाग म्हणून आव्हानांचा स्वीकार करत त्यांचा धैर्याने सामना करण्यास शिकले. तसेच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मी आणि बाकी सर्व टीम जीव धोक्यात घालून मालिकेच्या सेटवर पोहोचलो होतो. परंतु आता कोरोना-धोका कमी झाला असल्यामुळे टेन्शनही कमी झाले आहे.’
महिलांनी पुरूषांप्रमाणे समान दर्जा मिळण्यासाठी लांबचा पल्ला गाठला आहे. तरीही अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. महिलांनी त्यांच्या सर्व क्षमतांना सर्वतोपरी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करायला हवा जेणेकरून पुढे महिला दिन साजरा करण्याची गरज भासू नये.
हेही वाचा - महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री श्वेता शिंदे, प्रतिक्षा जाधव आणि प्रिया मराठे!
हेही वाचा - जान्हवी कपूरचे लेटेस्ट फोटो पहा