मुंबई - गुजराती रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे अभिनेता शर्मन जोशीचे वडील अरविंद जोशी यांचे आज पहाटे ३ च्या सुमारास मुंबईच्या जुहू येथील नानावटी रुग्णालयात निधन झाले. वयानुसार आजारांशी झगडणाऱ्या अरविंद जोशी यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
हिंदी चित्रपटातही केल्या होत्या भूमिका
अरविंद जोशी यांनी अनेक हिट गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, परंतु गुजराती नाटकांचे दिग्गज अभिनेता आणि गुजराती नाटकांचे दिग्दर्शक म्हणून त्यांची खरी ओळख होती. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अरविंद जोशी यांनी 'इत्तेफाक', 'शोले', अपमान की आग, 'खरेदीदार', 'कहानी' 'नाम' यासारख्या चित्रपटांत सहाय्यक कलाकार म्हणून छोट्या भूमिका केल्या. अनेक हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
प्रेम चोप्रा यांनी दिली निधनाबद्दल माहिती
अरविंद जोशी यांचे निकटवर्ती आणि सुप्रसिद्ध अभिनेता प्रेम चोप्रा म्हणाले की, "अरविंद खूप प्रामाणिक व्यक्ती होते. त्यांना गेल्या २ आठवड्यांपासून नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारपणामुळे ते आजारी होते आणि म्हणूनच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. गुजराती नाटकासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. " प्रेम चोप्रा हे शर्मन जोशीचे सासरे आहेत.
अरविंद जोशी यांच्यावर अंतिम संस्कार आज हिंदू प्रथेनुसार विलेपार्ले, मुंबई येथील स्मशानभूमीत ११ ते १२ च्या दरम्यान केले जातील.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शर्मन जोशी आणि मुलगी मानसी जोशी रॉय आहेत. टीव्ही जगतामध्ये मानसी हे एक सुप्रसिद्ध नाव आहे आणि ती अभिनेता रोहित रॉयची पत्नी आहे.
हेही वाचा -करिना आणि सैफला आहे नवीन घरात दुडूदुडू धावणाऱ्या पावलांची प्रतीक्षा!