पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांच्या व्हाय आय किल्ड गांधी ( Why I Killed Gandhi ) या चित्रपटावरून सध्या वाद सुरू असून काहींनी कोल्हे यांचा समर्थन केलं आहे तर काहींनी या चित्रपटावर बंदी घालावी अशी थेट मागणी केली आहे.
आत्ता या प्रकरणावर संभाजी ब्रिग्रेडनेदेखील ( Sambhaji Brigade ) आपली भूमिका व्यक्त केली आहे. ज्यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत पाहायचो त्याला आत्ता नथुराम गोडसे यांच्या भूमिकेत पाहायचं, एवढा विरोधाभास कसा असू शकतो. नथुराम प्रेमी डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारांशी गद्दारी केली असून महाराष्ट्र सरकारने त्याचा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये आणि या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिग्रेड यानी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणारे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे आगामी चित्रपटात नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. परंतु त्यांच्या या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. कोल्हे यांच्या या निर्णयावर सोशल मीडिया, राजकीय नेते आणि कार्यकर्ते टीका करीत आहेत. परंतु 'पडद्यावरील भूमिका आणि राजकीय भूमिका यात गल्लत करू नका,' अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून येत्या महिनाअखेरीस तो ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.