मुंबई - डॉ. अमोल कोल्हे व सयाजी शिंदे अभिनेते तर आहेतच पण त्याहूनही कट्टर पर्यावरण प्रेमी आहेत. सयाजी शिंदे तर स्वखर्चाने जागोजागी वृक्ष लागवड करीत असतात आणि पर्यावरण वाचविण्यासाठी धडपडत असतात व इतरांनाही प्रेरित करीत असतात. डॉ. अमोल कोल्हे किती शिवराय प्रेमी आहेत हे सांगण्याची गरजच नाही.
आपल्यातल्या स्त्रीशक्तीचा प्रत्यय देत सामाजिक संस्कारांचा आदर्श घालून देणाऱ्या जिजाऊ मातेने स्वराज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. अशा या थोर राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेच्या टीमने १५० रोपटी लावली. या कार्यक्रमाला अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि वृक्षसंवर्धन चळवळीत अग्रणी असलेले अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.
शिवजयंती निमित्ताने शिरूर येथे बायोडायव्हर्सिटी प्लांटची उभारणी करणार असल्याचे डॉ. कोल्हेनी या वेळी सांगितलं. शिवभक्तांबरोबर या वृक्षारोपणाची हिरवी मशाल, या वृक्षारोपणाचा विचार घेऊन या वेळी शिवनेरीवर देखील जाऊ असंही ते म्हणाले. जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त मी सगळ्यांना हे आव्हान करतो की झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान द्या तरच लोक त्यांना जपतील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
हेही वाचा - अबोल मैत्रीची बोलकी गोष्ट घेऊन ‘पिटर’ येतोय २२ जानेवारीला!