झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या आणि विजू माने यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘पांडू’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. या टिझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील ‘जाणता राजा’ गाणं रसिकांच्या भेटीला आपले आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणाऱ्या ‘जाणता राजा’ या गाण्याचे गीतकार आहेत समीर सामंत तर ते संगीतबद्ध केलंय महाराष्ट्राचा लोकप्रिय संगीतकार अवधूत गुप्ते यांनी. आजवर आपल्या धारदार आवाजाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आदर्श शिंदेने हे गाणं त्याच जोशात आणि ढंगात गायलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत या चित्रपटात कोणते कलाकार असतील याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता आणि उत्कंठा आता आणखीनच वाढणार आहे कारण यात अभिनेता प्रविण तरडे एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीही यात एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.
‘मुळशी पॅटर्न’ मध्ये आपल्या रांगड्या भूमिकेने महाराष्ट्राचे आणि बॉलिवूडमधील दिग्गजांचेही लक्ष वेधून घेणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे. आजवर विविध प्रकारच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या प्रविण तरडेंचा आगळा वेगळा करारी बाणा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आगामी ‘पांडू’ या चित्रपटांमधून. एका शिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र ते या चित्रपटात साकारत आहेत. या चित्रपटातील ‘जाणता राजा’ हे छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं गाणं आज प्रदर्शित झालंय. या गाण्यामधून प्रविण तरडेंचा वेगळा लूक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘पांडू’ चित्रपटातील या भूमिकेसाठी प्रविण तरडेंचा एक खास लूक तयार करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि प्रेम असणाऱ्या एका करारी बाण्याच्या राजकीय नेत्याची भूमिका तो यात साकारत आहे. याबद्दल प्रविण तरडे म्हणतात की,“या भूमिकेबद्दल मी कमालीचा उत्सुक आहे. हा लूक प्रेक्षकांसमोर कधी येतो याची मी स्वतः गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होतो. झी स्टुडिओजने माझ्या वाढदिवशी हे गाणं आणि माझा हा लूक प्रेक्षकांसमोर आणायचं ठरवलं याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही. हे गाणं, हा लूक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.”
मराठी चित्रपटांची विनोदी परंपरा जपण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी झी स्टुडिओजचा ‘पांडू’ हा चित्रपट येत्या ३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - महिला प्रवाशांची जेव्हा 'इंग्लंड टूर' सुरु होते तेव्हा सुरु होतो आनंदाचा खेळ ‘झिम्मा’!