मुंबई - यंदाच्या फेमिना 'मिस इंडिया २०१९' चा निर्णय जाहीर झाला आहे. यामध्ये राजस्थानच्या सुमन राव हिने यंदाचा 'मिस इंडिया' किताब पटकावला आहे. शनिवारी (१५ जून) मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअमवर मिस इंडियाचा ग्रँड फिनाले पार पडला.
या सोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. करन जौहर, मनीष पॉल, माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यांनी या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. हुमा कुरैशी, चित्रागंदा सिंह, रेमो डिसूजा, आयुष शर्मा, मुकेश छाबरा, दिया मिर्झा आणि नेहा धुपियासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.
मिस इंडिया स्पर्धेत ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये दुसरे स्थान छत्तीसगढच्या शिवानी जाधवने पटकावले. ती यावर्षी मिस ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. तिसऱ्या स्थानी बिहारच्या श्रेया रंजनने बाजी मारली. ती मिस युनायटेड ब्युटी स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर, तेलंगणाच्या संजना विज ही देखील रनरअप ठरली.