मुंबई - मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट लवकरच नागेश कुकनूर दिग्दर्शित 'सिटी ऑफ ड्रीम्स' या हिंदी वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या आणि प्रियाच्या अवतीभोवती फिरणाऱ्या या वेबसिरीजमध्ये तिच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू उलगडणार आहेत.
प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने 'चारचाँद' लावले. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही कौतुक केले.
हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा गाजवणार यात शंका नाही. प्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती आणि नागेश कुकनूर यांचे दिग्दर्शन असणाऱ्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजमध्ये प्रिया दिसणार आहे. नागेश यांनी यापूर्वी बॉलिवूडला 'डोर', 'इक्बाल', 'धनक' यांसारख्या उत्तम कलाकृती दिल्या आहेत.