अभिनेता व निर्माता प्रशांत दामले आपल्या सहकाऱ्यांची उत्तम काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कोरोना विषाणूमुळे नाट्यव्यवसायावर आलेलं संकट लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पडद्यामागील 23 कामगाराना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत नुकतीच देऊ केली आहे.
जगभरामध्ये हाहाकार उडवून दिलेल्या कोरोना विषाणूचे भारतातही बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात केल्यानंतर सर्व चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद आहेत.
बंदचा फटका नाट्यक्षेत्राला बसला आहे. नाटकांचे सर्व प्रयोग सध्या रद्द करण्यात आल्यानं नाट्यव्यवसाय पूर्ण पणे ठप्प आहे. याचा परिणाम नाट्य सृष्टीवरही पडत असून अनेक नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आल्याने नाट्यक्षेत्रातील कामगारावर आर्थिक परिणाम झाला आहे. अशावेळी सामाजिक भान राखत प्रसिद्ध मराठी अभिनेता व निर्माता प्रशांत दामले यांनी पडद्यामागील कामगारांना मदतीचा हात पुढे केला असून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.