औरंगाबाद - संत एकनाथ रंगमंदिराबाबत 2017 साली अभिनेते प्रशांत दामले यांनी सर्वात आधी खंत व्यक्त केली होती. इतकंच नाही तर त्यांनी स्थानिक कलाकारांसोबत हातात झाडू घेऊन नाट्यगृहाची स्वच्छता केली होती. या घटनेला दोन वर्ष झाली असली तरी नाट्यगृहाची दुरुस्ती अद्याप झाली नसल्याने प्रशांत दामले यांनी खंत व्यक्त केली.
औरंगाबाद शहराच्या कलाकारांना नाट्यभूमीशी ओळख करून देणारे व्यासपीठ म्हणजे संत एकनाथ रंगमंदिर. शहरातील सर्वात जुनं असं रंगमंदिर. या रंगमंदिरात अनेक मोठ्या कलाकारांनी आपल्या कला क्षेत्राच्या वाटचालीला सुरुवात केली. मात्र गेल्या काही वर्षात महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे रंगभूमीची दुरवस्था झाली. त्याबाबत अनेक कलाकारांनी रोष व्यक्त केला. सुमित राघवन, प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे या कलाकारांनी सोशल मीडियावर अक्षरशः महानगर पालिकेचे वाभाडे काढले. त्यानंतर पालिकेने रंगमंदिर दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र हे करत असताना कुठलेही नियोजन केले नाही. परिणामी संत एकनाथ रंग मंदिर गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलं आहे. नाट्यमंदिराच्या कामाची गती संथ असल्याने स्थानिक कलावंतांनी अनेक वेळा महानगर पालिकेकडे पाठपुरावा केला. अनेक आंदोलने उभी राहिली. मात्र नाट्य मंदिराच्या कामाची गती मंदावलेली पाहायला मिळाली.
दोन वर्षांपूर्वी प्रशांत दामले यांनी नाट्यमंदिर स्वच्छ करत आंदोलन केल्यावर दोन वर्षात काय स्थिती आहे, याची पाहणी केली. मात्र रंगमंदिरात पाय ठेवताच समोर असलेली परिस्थिती पाहून त्यांनी पालिकेच्या कामावर ताशेरे ओढले. स्थानिक नवोदित कलावंतांनी अर्धवट काम झालेल्या व्यासपीठावर प्रशांत दामले यांच्या समोर आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे नाटक सादर करत अनोखं आंदोलनं केले. त्यावेळी राजकारणी लोकांना कलावंत शेवटी आठवतो. मात्र आमच्या पेक्षा ते खूप मोठे अभिनेते आहेत हे गेल्या दोन महिन्यांमध्ये दिसून आलं असा टोला त्यांनी राजकारण्यांना लगावला. या बाबत महापौर नंदकुमार घोडेले यांनी खंत व्यक्त करत सर्वात अत्याधुनिक असे रंगमंदिर उभारू अस आश्वासन दिलं.