इंडियन आयडॉल हा एक असा सांगीतिक रियालिटी शो आहे ज्याने भारतीय संगीतक्षेत्राला, खासकरून चित्रपटसृष्टीला, अनेकविध गायक दिले. नुकताच त्या शोच्या १२व्या पर्वाचा अस्त झाला आणि पहाडी गायक अष्टपैलू पवनदीप राजन नवीन इंडियन आयडॉल ठरला. एक व्यासपीठ म्हणून इंडियन आयडॉलने भारताला बरेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक दिले आहेत. या कार्यक्रमासाठी स्पर्धकांनी कठीण ऑडिशन्स, गाला फेऱ्या आणि मनोरंजक सादरीकरणासह प्रेक्षकांना आपलेसे केले. यातील ६ स्पर्धक, पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, निहाल तौरो व षण्मुखप्रिया, अंतिम फेरीत पोहोचले होते. सोनीच्या १२ तास चाललेल्या ‘द ग्रेटेस्ट फिनाले एव्हर’ मध्ये ४० हून अधिक रंगारंग कार्यक्रम आणि २०० पेक्षा जास्त गाण्यांसह अंतिम सोहळा बहारदार झाला. यात, मुलायम परंतु वेगळ्याच दर्दभऱ्या आवाजाचा, कुठलेली वाद्य लीलया वाजवत गाणारा पवनदीप राजनने विजेत्याची ट्रॉफी पटकावली.
संगीत आणि या हंगामातील प्रतिभावान सहभागींचा उत्सव साजरा करताना, इंडियन आयडॉल-सीझन १२ ची समाप्ती १२ तासांच्या ‘म्युझिकल एक्स्ट्राव्हांझा’ सह ‘द ग्रेटेस्ट फिनाले एव्हर’ च्या रूपात झाली. टॉप ६ फायनलिस्टपैकी कोण विजेता म्हणून घोषित केले जाईल हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण देश वाट बघत होता आणि उत्तराखंडच्या चंपावत येथील पवनदीप राजनला या सीझनचा विजेता म्हणून घोषित केले गेले आणि त्याने प्रतिष्ठित इंडियन आयडॉल ट्रॉफी उचलली.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन कडून इंडियन आयडॉल विजेत्या पवनदीपला २५ लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. तसेच त्याला एक मारुती सुझुकी स्विफ्ट कार गिफ्ट म्हणून मिळाली. पहिल्या ६ फायनलिस्टमधून अरुणिता कांजीलाल आणि सायली कांबळे यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यांना ५ लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तिसरा आणि चौथा उपविजेता ठरले मोहम्मद दानिश आणि निहाल तौरो. त्यांना प्रत्येकी ३ लाख रुपये बक्षीस देण्यात आले. सर्व टॉप ६ फायनलिस्टना
७५००० रुपयांचा रु. चा धनादेश मिळाला व राज सुपरव्हाइट आणि कोलगेट गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.
अष्टपैलू आणि प्रभावी पवनदीप राजन ज्याने प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक कामगिरीने सर्वांचे मन जिंकले. पवनदीप मितभाषी असून फारसा व्यक्त होत नाही. त्याच्या गाण्यातून त्याच्या प्रतिभेचा अंदाज येतो. त्याने अनेक वाद्ये वाजवीत आपली गाणी सादर केली आणि रसिकांना, परीक्षकांना आणि प्रेक्षकांना अवाक केले. त्याने चक्क तबला, ड्रम्स, पियानो, अकोर्डीयन, बासरी सारखे अनेक वाद्ये वाजवीत गाणी सादर केली. असे करणारा तो एकमेवाद्वितीय असावा. पवनदीपने प्रत्येकाच्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन कामगिरी केली आहे. संगीत उद्योगाच्या दिग्गजांसमोर कामगिरी करण्यापासून ते सेलिब्रिटींपर्यंत आणि त्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कामगिरीने संगीतक्षेत्राला सामोरे जाण्यापासून, पवनदीप आता उज्ज्वल भविष्याची वाट पाहत आहेत.
“मी सतत काहीनाकाही नवीन शिकण्याच्या प्रयत्नात असतो. या संपूर्ण प्रवासामध्ये शिकण्यासाठी आणि स्वतःला कलाकार म्हणून वाढविण्यासाठी सतत प्रयत्न केले. एका कलाकाराला एका व्यासपीठाची गरज असते, ज्याद्वारे तो प्रत्येकाला आपली प्रतिभा दाखवू शकतो. इंडियन आयडॉल हे असेच एक उत्तम व्यासपीठ आहे. यातून खूप प्रेम आणि प्रशंसा मिळत गेली याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. हा शो प्रत्येक स्पर्धकाला त्याचे टॅलेंट दर्शविण्यासाठी प्रोत्साहित करतो. मला आनंद आहे या शोच्या एक हिस्सा बनण्याचा. पडद्यामागचे सर्व सहकारी तुमचा परफॉर्मन्स कसा उत्तम होईल यासाठी झटत असतात. मी त्या सर्वांना नमन करतो”, असे पवनदीप राजन म्हणाला.
तब्बल ८ महिने चाललेल्या इंडियन आयडॉल १२ चे सुरुवातीला परीक्षक होते हिमेश रेशमिया, विशाल ददलानी आणि नेहा कक्कर. मध्यंतरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रत्येक शोची वेळापत्रकं, शूटिंगची जागा बदलण्यास भाग पडले. यातील नेहा कक्कर व विशाल ददलानी हे मुंबईबाहेर, काही कारणास्तव, जाऊ शकले नव्हते आणि त्यांच्या जागी अनु मलिक आणि नेहाची बहीण सुप्रसिद्ध गायिका सोनू कक्कर यांची वर्णी लागली. हे पाचही परीक्षक पवनदीप राजन च्या गायकीवर बेहद खूष होते आणि पवनदीप ने काही गाणीही रेकॉर्ड केली आहेत.
“इंडियन आयडॉल सीझन १२ चा एक भाग होणे हे एक स्वप्न साकार होण्यागत होते आणि नंतर टॉप ६ चा भाग होणे केवळ आश्चर्यकारक आणि आनंददायक होते. इंडियन आयडॉल सीझन १२ चे विजेतेपद जिंकणे माझ्यासाठी फक्त अविश्वसनीय आहे. मला अजूनही असे वाटते की मी स्वप्न पाहत आहे. हे खरे आहे असे मला अजूनही वाटत नाहीये. माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे. मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी माझ्यासाठी मतदान केले आणि मला हे सन्माननीय विजेतेपद मिळवून दिले. इंडियन आयडॉलवरील माझ्या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार मानण्यासाठी मी ही संधी घेऊ इच्छितो. निर्मात्यांपासून संगीतकारांपर्यंत, आमचे प्रशिक्षक आणि माझे सहकारी स्पर्धक, ही ट्रॉफी तुमच्या सर्वांची आहे. धन्यवाद इंडियन आयडॉल आणि भारतातील नागरिक. ही भावना सर्वोत्तम आहे आणि खूप खूप धन्यवाद”, अत्यंत भावुक होत पवनदीप राजन म्हणाला.
हेही वाचा - Indian Idol12 : पवनदीप राजन बनला विजेता तर मराठमोठी सायली कांबळे ठरली दुसरी रनरअप