मुंबई - वकील म्हणजे न्यायप्रणालीचा एक चेहरा असतो. एक वकील म्हणून प्रख्यात विधीतज्ज्ञ आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती करण्यात येणार आहे. 'ओह माय गॉड' चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 'निकम' असे या बायोपिकचे नाव असणार आहे.
'निकम' या बायोपिकमध्ये उज्वल निकम यांच्या करिअरमधील महत्त्वाच्या घडामोडी पडद्यावर दाखवण्यात येणार आहेत. उमेश शुक्ला यांच्यासोबतच सेजल शाह, आशिष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडलिया हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
या बायोपिकबाबत बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, की 'मागील बऱ्याच दिवसांपासून मला माझ्या आयुष्यावर पुस्तक किंवा चित्रपट तयार करण्यासाठी विचारणा करण्यात येत होती. याबद्दल मी आश्वासक नव्हतो. कारण, माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. मात्र, प्रतिभाशाली टीमसोबत जुळून अखेर मी या बायोपिकसाठी तयार झालो. मला या टीमवर विश्वास आहे. ते या बायोपिकला योग्य तो न्याय देतील'.
उज्ज्वल निकम यांनी आत्तापर्यंत बरेच कठीण खटले लढले आहेत. २६/११ च्या खटल्यादरम्यान ते चर्चेत आले होते. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले. बहुचर्चित खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यामध्ये १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांची विशेष सरकारी वकील पदावर नेमणूक झाली. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची ही सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या इत्यादी खटलेही ते लढले आहेत. त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये ६२८ गुन्हेगारांना जन्मठेप आणि ३७ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे.
उज्ज्वल निकम यांची ओळख एक क्रिमिनल लॉयर म्हणून आहे. तसेच ते एकमेव वकील आहेत ज्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे.
त्यांच्यावर आधारित 'निकम' या बायोपिकच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये कोणते कलाकार भूमिका साकारणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे.