मुंबई - आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं...! असा प्रेमळ आग्रह हमखास प्रत्येक लग्नाच्या पत्रिकेत केलेला आपल्याला दिसतो. मात्र, सलील कुलकर्णी दिग्दर्शित आगामी 'वेडिंगचा सिनेमा' या सिनेमात मात्र यावरच एक खास गाणं तयार करण्यात आलं आहे. सलील कुलकर्णी यांच्या या सिनेमातील सगळीच गाणी काहीशी हटके आहेत.
आधी प्रपोज करताना मनातील भावना मांडणारे बोल पक्या.., आणि आता लग्नघरातील छोट्या मुलाची मनोवस्था मांडणार हे मामाच्या लग्नाला हे गाणं तितकंच खास आहे. या गाण्याला खुद्द सलील यांनीच संगीतबद्ध केलं असून संदीप खरे यांनी ते लिहिलं आहे. तर सलील यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी, आर्या आंबेकर आणि प्रसनजित कोसंबी यांनी हे गाणं गायलं आहे. लग्नाची तयारी सुरू असताना ते चित्रित करण्यात आलं आहे. त्याचा मूडही एकदम मस्त जमून आलाय.
वेडिंगचा सिनेमा चित्रपटात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, अल्का कुबल, शिवाजी साटम, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमधर, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे मुख्य भूमिकेत आहेत. १२ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. तोपर्यंत बघा हे नवीन गाणं तुम्हाला आवडतंय का.