संगीत रियालिटी शो इंडियन आयडॉल आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचा अत्यंत लाडका कार्यक्रम आहे. इंडियन आयडॉलच्या मंचाने एकापाठोपाठ अनेक वर्षे आपल्या देशाला उत्कृष्ट गायक दिले आहेत तसेच देशाच्या काना-कोपर्यातून संगीत-प्रतिभा शोधून काढली आहे. इंडियन आयडॉलचे यंदाचे सत्र ‘ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले’ च्या टप्प्याशी येऊन पोहोचले आहे आणि अंतिम फेरीतील स्पर्धक इंडियन आयडॉल १२ चे विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
इंडियन आयडॉलच्या या सत्रात देशभरातून अनेक प्रतिभावान कलाकारांनी सहभाग घेतला. त्यापैकी एक गुणी गायक होता, नचिकेत लेले. या शो मध्ये त्याने एकापेक्षा एक असे अनेक उत्तमोत्तम परफॉर्मन्स दिले आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. या शोच्या फिनालेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे सगळे माजी स्पर्धक या मंचावर येत आहेत. नचिकेत लेले अत्यंत आकर्षक रूपात या शोमध्ये दिसणार आहे. ‘फौजी स्पेशल’ भागात तो गांधीजींच्या वेषात दिसणार आहे आणि ‘रघुपती राघव राजाराम’ गाणार आहे.
याबद्दल बोलताना नचिकेत लेले म्हणाला, “आपले सैन्य म्हणजे आपल्या देशाची शान आहे. त्यामुळे आपल्या शोच्या सेट्सवर त्यांच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केला आहे. आगामी भागात मी गांधीजींच्या वेषात दिसणार आहे. आपल्या संरक्षण दलांच्या आग्रहाखातर मी देशभक्ती गीते सादर करणार आहे. ‘रघुपती राघव राजाराम’ या महान गीताला मी न्याय देऊ शकलो आहे, असे मला वाटते. आपल्या सेनेसाठी परफॉर्म करण्याचा मान मला दिल्याबद्दल मी इंडियन आयडॉलचा आभारी आहे. तो एक सुंदर क्षण होता, जो सदैव माझ्या स्मरणात राहील.”
तब्बल १२ तास चालणारा इंडियन आयडॉल १२ चा अति भव्य फिनाले १५ ऑगस्ट रोजी सोनीवर प्रसारित होणार आहे.