मुंबई - मुंबईतील नाट्यगृहाचे भाडे कमी करावे अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या नाट्यगृहांच्या भाड्यात ५० ते ७५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाट्य रसिक आणि नाट्य निर्मात्यांना याचा नक्की फायदा होईल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
भाड्यात सूट देण्याची मागणी -
जगभरात पसरलेल्या कोव्हीडच्या महामारीमुळे महापालिकेच्या अखत्यारीतील नाट्यगृहे मार्च 2020 पासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर मिशन बिगीन अंतर्गत नाट्यगृहे, चित्रपट गृहे सुरू करण्यात आली. मात्र मार्चपासून लॉकडाऊन आर्थिक अडचणी आणि नाट्यगृहातील ५० टक्के उपस्थिती यामुळे नाट्यनिर्मात्यांना नाटकाचे प्रयोग करणे शक्य नव्हते. त्यासाठी नाट्यनिर्माता संघटनेने महापौरांची भेट घेऊन नाट्यगृहाच्या भाड्यात ५० ते ७५ टक्के सूट देण्याची मागणी केली होती. याबाबत मुंबईच्या महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. यानुसार मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील विलेपार्ले पूर्व येथील दीनानाथ, बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे, मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृहाचे भाडे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
भाड्यात सूट -
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील विलेपार्ले पूर्व येथील दीनानाथ, मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृहात ४०० रुपये इतका तिकीट दर घेतला जातो. या नाट्यगृहात मराठी नाट्य प्रयोग करण्यासाठी ५ हजार रुपये तर अमराठी नाट्यप्रयोग करण्यासाठी १० हजार रुपये इतके भाडे घेतले जाणार आहे. तर बोरिवली येथील प्रबोधनकार के सी ठाकरे नाट्यमंदिरमध्ये १५० रुपये इतके तीकिट दर आकाराला जातो. या नाट्यगृहात मराठी नाट्यप्रयोगासाठी ३ तर अमराठी नाट्य प्रयोगासाठी ६ हजार रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. नाट्यगृहात ५० टक्के रसिकांच्या उपस्थितीत नाट्यप्रयोग करावे लागणार असल्याने ५० ते ७५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च २०२१ पर्यंत ही सवलत राहील. नाट्य निर्मात्यांनी याचा लाभ घेऊन नाट्यप्रयोग सुरु करावेत असे आवाहन महापौरांनी केले. कोरोनामुळे बालनाट्याना नाट्यप्रयोग करण्यास परवानगी नसेल असेही महापौरांनी सांगितले.
किती आकारले जाणार भाडे -
मराठी नाटकांकरता १९८५० ऐवजी आता ५ हजार रूपये भाडे आकारले जाईल, याचे तिकिट ४०० पर्यंत असेल. अमराठी नाटकांसाठी ३९६९० ऐवजी १० हजार रूपये आकारले जाणार आहे.
हेही वाचा - संजना सांघीने 'ओम' चित्रपटाचे शुटिंग केले सुरू
शेलारांच्या आरोपात तथ्य नाही -
आशिष शेलार यांनी माझ्या जावयाला कंत्राट दिल्याचा आरोप केला आहे. त्यांना पालिकेच्या नियमाप्रमाणे आणि अटीनुसार कंत्राट दिले आहे. माझा जावई म्हणून कंत्राट दिलेले नाही. त्यामुळे शेलारांच्या आरोपात तथ्य नाही असे महापौर म्हणाल्या.
हेही वाचा - कार्बन फुटप्रिंटबद्दल जागरुकता वाढवणार भूमी पडणेकर