मुंबई - मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक नवनवीन तरुण कलाकार आपल्या अभिनयाने छाप सोडत प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. अशाच पैकी एक कलाकार म्हणजे मोनालीसा बागल. 'टोटल हुबलाक' ही लॉकडाऊन निमित्ताने नवीन मालिका सुरू झाली असून मोनालीसा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
![Mona Lisa's entry into the TV world](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-total-hublock-monalisa-mhc10076_22062020172530_2206f_1592826930_1060.jpg)
"सौ शशि देवधर" या २०१४मध्ये आलेल्या चित्रपटामध्ये छोट्या सईची म्हणजे 'छोट्या शशि'ची भूमिका मोनालीसाने निभावली होती. इथून तिच्या अभिनयाच्या आणि मनोरंजन सृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मनोरंजन सृष्टीत हुशार आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेल्या मोनालीसा बागलची प्रेम संकट, झाला भोभाटा, ड्राय डे, सोबत यासारख्या चित्रपटातून कारकीर्द चालूच राहिली.
गेल्याच वर्षी परफ्युम या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. प्रदीर्घ काळ चित्रपट केल्यानंतर तिने आता आपला मोर्चा टीव्ही मालिकेच्या प्रेक्षकांकडे वळवला असून टोटल हुबलाक या नवीन विनोदी मालिकेद्वारे ती लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.