मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाते. रोजगारासाठी आलेली माणसं या शहराला कायमची चिकटतात. मनोरंजनसृष्टीतही रोज हजारोंनी मुलं-मुली यात असतात परंतु त्यातील काहींनाच प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा मौका मिळतो. एकदा का नाव झालं की पुढची पायरी असते स्वतःचं घर. खरंतर मुंबईत स्वतःचे घर घेणे हे महाकठीण काम आहे कारण इथल्या घराच्या किमती. पण भाड्याच्या घरात राहून भाडं देत बसण्यापेक्षा अनेक कलाकार बँकेचं कर्ज काढून त्याचे हप्ते देणे पसंत करतात कारण घर स्वतःच्या मालकीचं असतं.
![Mona Lisa Bagel](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-monalisa-bagal-puchases-flat-mhc10001_16062021011216_1606f_1623786136_593.jpeg)
आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात आपले स्वतःचे नाव, अस्तित्व निर्माण केल्यावर अनेकांची इच्छा असते की आपलं स्वतःचं, आपल्या कष्टातून उभं राहिलेलं आणि आपल्या हक्काचं असं घर असावं. अनेकांनी घराचं स्वप्न स्वप्न पाहिलेलं असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते आणि कोणीतरी सांगितलंच आहे की, 'इच्छा तिथे मार्ग' आणि असच घडलंय अभिनेत्री मोनालीसा बागल तिच्या आयुष्यात. मोनालिसाच्या पाचेक वर्षांपूर्वी ‘प्रेम संकट’ या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. ‘ड्राय डे’, ‘सोबत’, ‘परफ्युम’ ई. चित्रपटांतून ती झळकली. तिचा ‘झाला बोभाटा’ विशेष गाजला.
![Mona Lisa Bagel](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-monalisa-bagal-puchases-flat-mhc10001_16062021011216_1606f_1623786136_920.jpeg)
गेल्या वर्षी मोनालिसाचा झी टॉकीज निर्मित 'गस्त' हा सिनेमा प्रदर्शित झाला. अभिनेत्री मोनालीसा बागल ही आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमा, मालिकेतून, वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. सोशल मीडिया वरचे तिचे फोटोज् देखील तिच्या फॅन्सना आवडत आहेत. सोशल मीडियावर नुकतेच तिच्यावर अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव झाला कारण तिने स्वकमाईतून तिची घराची इच्छा, स्वप्न पूर्ण केले. एवढ्या कमी वयात तिने घेतलेली उंच भरारी यासाठी तिचे विशेष कौतुक झाले पण उंच भरारी घेण्यामागे ती तिच्या कुटुंबाला श्रेय देते.
![Mona Lisa Bagel](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-monalisa-bagal-puchases-flat-mhc10001_16062021011216_1606f_1623786136_280.jpeg)
घरासंबंधीची सोशल मीडिया वर पोस्ट करताना तिने म्हटले होते की, "माझं स्वतःचं घर असावं ही माझी इच्छा होती आणि ती आता पूर्ण झाली आहे, मात्र एका गोष्टीची खंत वाटते की माझ्यासोबत जिने हे स्वप्न पाहिले ती माझी आई आज आता माझ्यासोबत नाही. पण आई गेल्या नंतर माझी काकू 'पन्ना हेमंत राणे' हिने मला आधार दिला. आई नंतर आईसारखं कोणी माझ्यावर प्रेम केलं असेल तर ती माझी काकू. माझे स्वप्न पूर्ण होण्यात, माझ्या करिअरमध्ये काकूचा देखील मोलाचा वाटा आहे. असं म्हणतात ना की 'कुटुंब हेच सर्वकाही असतं' आणि माझे आई-वडील दोघेही नसताना मला कुटुंबा सारखंच प्रेम काका, काकूंनी दिलं. ते दोघेही माझे आधारस्तंभ आहेत.”
![Mona Lisa Bagel](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-monalisa-bagal-puchases-flat-mhc10001_16062021011216_1606f_1623786136_386.jpeg)
मोनालिसा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘छोटी सई ताम्हणकर’ म्हणून ओळखली जाते. ती झी मराठीचा विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मधूनसुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करीत होती. लवकरच तिचे नवीन सिनेमे देखील पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा - ‘रामायण’ मालिकेतील 'आर्य सुमंत' ज्येष्ठ अभिनेता चंद्रशेखर कालवश