मुंबई - 'राजी' चित्रपटाद्वारे आपल्या दमदार दिग्दर्शनाची प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या मेघना गुलजार यांचा 'छपाक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या आणि इतरांसाठी प्रेरणा बनलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिकाने लक्ष्मी यांची भूमिका साकारण्यासाठी 'मालती' नावाचे पात्र साकारले आहे. अलिकडेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात दीपिकाने आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. त्यामुळे दीपिका ते 'मालती' असा तिचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. असे मेघना गुलजार यांनी सांगितले आहे.
'छपाक' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच चर्चेत आला तो म्हणजे दीपिकाचा लूक. असिड हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीचा चेहरा हुबेहुब तिने तिच्या चेहऱ्यावर साकारला आहे. त्यामुळे तिच्या या पहिल्याच लूकचे सर्वांनी कौतुक केले. मेघना गुलजार यांनी तिच्या या प्रवासाबद्दल एका माध्यमाशी बोलताना संवाद साधला. त्या म्हणाल्या 'दीपिका पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारत असल्यामुळे तिच्या या चित्रपटातील लूकबद्दल सर्वांना उत्सुकता होती. जेव्हा तिचा पहिला लूक समोर आला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. एका अभिनेत्रीने चित्रविचित्र लूकसाठी आपल्या चेहऱ्यावर प्रयोग करणे यासाठी खूप हिंमत लागते. कारण, प्रेक्षकांना अभिनेत्रीला या सुंदर आणि ग्लॅमरस रूपात पाहायचे असते. मात्र, दीपिकाने या चित्रपटासाठी आपला लूक पूर्णत: बदलण्याचा प्रयत्न केला'.
दीपिकाने 'मालती'ची भूमिका साकारताना खूप भावुक झाली होती. तिने ही भूमिका अगदी समरसुन साकारली आहे. दीपिकासोबत या चित्रपटात विक्रांत मेस्सीदेखील झळकणार आहे. या दोघांनीही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली, असेही त्या पुढे म्हणाल्या.