मुंबई - नाटक कंपनी निर्मित 'के दिल अभी भरा नही' या नाटकाचा २५० वा प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मोठ्या थाटात पार पडला. पती पत्नीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या नाटकाच्या २५० व्या प्रयोगाला मराठी कलाक्षेत्रातील काही खास जोड्या आवर्जून उपस्थित होत्या.
सचिन आणि सुप्रिया पिळगावकर, सचिन खेडेकर आणि त्यांची पत्नी जेलपा खेडेकर, दिग्दर्शक एन चंद्रा, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री सुहिता थत्ते, लेखिका रोहिणी निनावे असे अनेक मान्यवर या खास प्रयोगासाठी आवर्जून उपस्थित राहिले. या सर्वांनी नाटक पाहून आपल्या पसंतीची पावती दिली. त्यासोबतच नाटकाच्या ५०० व्या प्रयोगासाठी आवर्जून बोलवण्याचं आश्वासनही मिळवलं.
प्रयोग संपल्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी आपलं मनोगत मांडलं. त्यानंतर नाटकाच्या टीमने केक कापून या यशाचं जंगी सेलिब्रेशन केलं. पती पत्नीच्या कडू गोड नात्यावर आधारित नाटक असल्याने मंगेश कदम आणि लीना भागवत या रिअल लाईफ कपलला एकमेकांसोबत काम करायला भलतीच मजा येते. नाटकातील अनेक प्रसंग घराघरात घडणारे असल्याने प्रेक्षक ते चांगलेच एन्जॉय करतात.
शेखर ढवळीकर लिखित या नाटकाचे सुरुवातीचे काही प्रयोग ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि रीमा लागू यांनी केले होते. मात्र, गोखले यांना घशाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी या नाटकाचे प्रयोग करण थांबवलं. परंतु, या दोघांनीही दिग्दर्शक मंगेश कदम आणि त्यांची पत्नी अभिनेत्री लीना भागवत यांना या नाटकाचे प्रयोग पुढे सुरु ठेवायला सांगितले.