मुंबई - महाराष्ट्राचा लाडका ‘श्री’ म्हणजेच बहुचर्चित मालिका 'होणार सून मी ह्या घरची' मधील शशांक केतकर. आपल्या गोड व लोभस स्वभावाने शशांक या मालिकेतून घराघरात पोहोचला. आता तो छोट्या पडद्यावर ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतून परत येत आहे. मात्र यात तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. शशांक केतकर या मालिकेत समरप्रताप या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. शशांक सोबत मालिकेत ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर तन्वी मुंडले हा नवीन चेहेरा या दोघांसोबत दिसेल.
‘पाहिले न मी तुला’मध्ये शशांक मालिकेतील अखंड प्रेमात असलेल्या जोडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करताना दिसेल. त्याला मानसी आवडत असते व कुठल्याही थराला जाऊन त्याला तिला प्राप्त करायचे आहे. मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. हे प्रेम लग्नाच्या नात्यात अडकण्याआधीच समरच्या विक्षिप्त नजरेत येते. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील संकटांना सुरुवात होते. पाठीवर छुपे वार करणाऱ्या प्रवृत्तीच्या समरला अनिकेत मानसी कसे सामोरे जातील हे दिसून येईल.
‘पाहिले न मी तुला’ १ मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वा. झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : चौथ्या कसोटीत भारत 'या' गोलंदाजाला खेळवणार?