नाशिक - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे म्हणत अनेक अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत होत्या आणि ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हा नक्की काय प्रकार आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर यावरील पडदा उठला असून त्याचे कारण आपल्या समोर आले आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' ही ७ भागांची वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी', व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे,आणि त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तेजस्वीनीचा बोल्ड अंदाज
आता लिपस्टिक आणि या वेबसिरीजचा काय संबंध आहे याचे उत्तर या वेबसिरीजमध्येच दडले आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसिरीजचे पोस्टर आणि टिझर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. टिझरमध्ये तेजस्विनीचा बोल्ड अंदाज दिसत असून तिच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दिसत आहेत. हे रहस्य नक्की काय आहे, हे ‘अनुराधा’ पाहिल्यावर आपल्याला कळेल.
नवीन प्रयत्न नक्की आवडेल
आजवर अनेक चित्रपट केले आहेत प्रथमच वेबसीरिज करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यासाठी उत्सुकही आहे. एकंदरच संमिश्र मनःस्थिती आहे. आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या आवडत्या टीमसोबत मी नवीन प्रोजेक्ट करतोय. आशा आहे प्रेक्षकांना माझा हा नवा प्रयत्न नक्कीच आवडेल, असं मतं दिग्दर्शक संजय जाधव यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा - काजल अग्रवाल 'आई होणार' बातमीमुळे चर्चेला उधाण