मुंबई - गेले वर्षभर महाराष्ट्रात कोरोनाची भयंकर स्थिती आहे. गेल्या वर्षी मोठा लॉकडाऊन झाला. त्याकाळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. आताही महाराष्ट्रत जे निर्बंध लादले जात आहेत त्यात अत्यवश्यक सेवांना सुरू ठेवण्याचा निर्णय होतोय. पण यामध्ये केबल व इंटरनेट धारकांना अत्यवश्यक सेवेमध्ये गणले जात नाही. तेव्हा यांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी केबल चालकांच्या संघटनेने महाराष्ट्राचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या काळात सर्व बंद होते मात्र घरोघरी अडकलेल्यांसाठी केबल धारक काम करीत होते. यामुळे लोकांना घरी थांबण्यास कारण मिळाले आणि दुसरे म्हणजे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना केबल धारकांच्या कष्टामुळेच यशस्वी ठरली. आजही लाखो लोक घरुन ऑफिसचे कामे करीत आहेत. त्यांना इंटरनेटचा पुरवठा नियमित व्हावा यासाठी इंटरनेट केबलसाठी काम करणारे लोक अत्यवश्यक सेवेत का गृहीत धरले जात नाहीत, असा सवालही या संघटनांनी केलाय.
दरम्यान, महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनच्या वतीनेही सरकारकडे मागणी केली की केबल टीव्ही आणि इंटरनेट ऑपरेटर्सना अत्यवश्यक सेवेत सामील करावे. स्थानिक पोलिसांना तशा सूचना द्याव्यात आणि पोलिसांकडून ऑपरेटर्सना परमिट देण्याचीही तरतूद करावी. त्यामुळे कोणताही अडथळा न येतो सेवा लोकांपर्यंत पोहोचवता येईल. कारण लॉकडाऊनमध्ये लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन या माध्यामातून होऊ शकते, असी मागणी महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी केली आहे.
हेही वाचा - शूटिंग वेळी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची जबाबदारी निर्मात्यांची