मुंबई - हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते तसेच फिल्ममेकर पीटर फोंडा यांचे ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. १९६९ साली आलेल्या 'ईझी रायडर' या चित्रपटातून ते सुपरस्टार झाले होते. लॉस एंजेलिस येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पीटर यांचे निधन फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, पीटर फोंडा यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे.
पीटर यांनी चित्रपटासोबतच टीव्ही मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्यांना ड्रग्जचे सेवन करण्याची सवय लागल्यामुळे ते फार काळ अभिनय करू शकले नाही. त्यामुळेच त्यांना कॅन्सरने ग्रासले होते. त्यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी शोक व्यक्त करत माध्यमांना त्यांच्या बऱ्याचशा आठवणी सांगितल्या.