मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन घराघरात झालेलं आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष घराघरात घुमू लागला आहे. सद्यस्थिति पाहता प्रत्येकाच त्या विघ्नहर्त्याकडे हेच मागणे आहे की, आपल्या सगळ्यांवर ओढवलेले कोरोनाचे हे संकट कायमचे दूर होवो...
कलर्स मराठी -
'कलर्स मराठी'वरील 'जीव झाला येडापिसा' आणि 'राजा राणीची गं जोडी' या मालिकामध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनाने सिद्धी-शिवा आणि संजीवनी–रणजीतच्या आयुष्यातील विघ्न देखील बाप्पाने दूर करावीत हीच मनोकामना बाप्पा चरणी मागताना या मालिकेत आपल्याला ते दिसतील.
झी मराठी -
दुसरीकडे झी मराठीच्या मालिकांमध्ये देखील गणेशोत्सवाचा असाच उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘माझा होशील ना’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘Mrs. मुख्यमंत्री’, आणि ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेट वर पण सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा होतो आहे. तसाच यातील काही मालिकांमध्ये देखील गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. यानिमित्ताने बाप्पाची आराधना करणाऱ्या सर्व कलाकार मंडळींनी विघ्नहर्त्या गणरायाकडे कोरोनाच संकट संपूर्ण जगातून आणि देशातून निघून जाऊदे आणि पुन्हा सर्व पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ दे अशीच प्रार्थना केली आहे.
स्टार प्रवाह -
तिकडे 'स्टार प्रवाह'वरील गणपतीनिमित्त देवा श्रीगणेशा ही खास 11 भागांची विशेष मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेतून 11 दिवस गणपती बाप्पाच्या 11 कथा आपल्याला पाहायला मिळतील. दुसरीकडे रंग माझा वेगळा, वैजू नंबर वन या मालिकांमध्ये देखील गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आपल्याला पहायला मिळेल.
झी युवा -
'झी युवा' वरील 'डॉक्टर डॉन' आणि 'ओलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकांमध्ये दणक्यात गणेशोत्सव साजरा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. डॅशिंग डॉन आणि डीन यांची प्रेमकहाणी नुकतीच सुरू झाली आहे. दुसरीकडे नचिकेत आणि सई यांच्या प्रेमाला देखील बहर आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही लव्हस्टोरीज आता बाप्पाच्या आशीर्वादाने पुढे जातात ते आपल्याला पाहायला मिळेल. याशिवाय झी युवा वर खास गणेशोत्सवानिमित्त 'युवोत्सव' या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक सेलिब्रिटी आपल्याला परफॉर्मन्स देताना दिसतील.
सोनी मराठी -
सोनी मराठी वहिनीवर दोन चरित्र मालिका सुरू असल्याने त्यात गणपती दाखवायला स्कोप नाही. मात्र, हम बने तुम बने या कौटुंबीक मालिकेत मात्र गणपतीनिमित्त खास एपिसोड आपल्याला पाहायला मिळेल. याशिवाय या चॅनलवर गणपती सुरू होण्याआधीच सिंगिंग स्टार या नवा कोरा सिंगिंग रिऍलिटी शो सुरू झाला आहे. सेलिब्रिटी कलाकार आणि त्याना मेंटर करणारे प्रतिथयश गायक असा या कार्यक्रमाच स्वरूप आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गणपतीच्या गण्यांची रेलचेल अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
तब्बल दोन महिन्यांच्या कडकडीत लोकडाऊननंतर टीव्ही क्षेत्राला काम सुरू करण्याची परवानगी मिळाली. केंद्र सरकारने आता या क्षेत्रासाठी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी या क्षेत्रावरील सारी संकट बाप्पाने याआधीच दूर केलेली आहेत. त्यामुळेच आता गणपतीचा सण साजरा करताना अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला यंदा गणेशोत्सवात अनुभवायला मिळणार आहे.