मुंबई - काल घनश्याम नायक म्हणजेच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील सर्वांचे लाडके नट्टू काका यांचे देहावसान झाले होते आणि आज सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महत्वाचे म्हणजे त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांना मेकअप करूनच शेवटचा निरोप देण्यात आला. त्यांच्या मुलाने खास मेकअपमनला बोलावले होते आणि शूटिंग दरम्यान करण्यात येतो तसा मेकअप घनश्याम नायक यांना करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली होती.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने होते ग्रस्त -
‘नट्टू काका’ यांच्या अंत्ययात्रेवेळी त्यांचे कुटुंबीय आणि तारक मेहता का उल्टा चश्माची संपूर्ण टीम उपस्थित होती. दिलीप जोशी (जेठालाल), भाव्या गांधी (टप्पू), समय शाह (गोगी), मुनमुन दत्ता (बबिता जी), मंदार चांदवडकर (भिडे), निर्माते असित कुमार मोदी यांच्यासह सर्व टीमने तिथे उपस्थिती लावली होती. तसेच घनश्याम नायक यांच्या सहकलाकारांनी समाज माध्यमांवरूनही शोकसंदेश पोस्ट केला. मृत्यूसमयी घनश्याम नायक यांचे वय ७७ होते आणि ते कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासित होते.
'ॲक्टिंग माझा श्वास आहे'
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये नट्टू काकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या घनश्याम नायक यांचे कर्करोगाशी दीर्घ लढाईनंतर निधन झाले. सेटवर ते नेहमी आनंदी असत आणि कोरोना काळात ते जेष्ठ नागरिक/कलाकार असल्यामुळे त्यांना सेटवर जाण्यास बंदी होती. त्यावेळेस त्यांनी इतर जेष्ठ कलाकारांसमवेत शासनाला पत्र लिहिले होते की त्या सर्वांनाही सेटवर जाऊन शूटिंग करण्यास परवानगी द्यावी. ‘ॲक्टिंग माझा श्वास आहे आणि शुटिंग करू शकत नसल्यामुळे मला गुदमरल्यासारखे होत आहे. मी हाडाचा कलाकार आहे आणि जे काही बरे वाईट होईल ते शूटिंग करताना झाले तर मी त्यात धन्यता मानेन’, असे त्यांनी गेल्यावर्षी कोरोना काळात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले होते.
मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर केल्या भावना व्यक्त -
१००+ गुजराती सिनेमे आणि ३५०+ मालिका यामधून काम केलेले घनश्याम नायक यांना देवाज्ञा झाली. तेव्हा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या सेटवर स्मशानशांतता पसरली. खरंतर त्यांनी कॅन्सरशी लढा दिला होता आणि ते हार मानायला तयार नव्हते. “कॅन्सर सारख्या रोगाशी लढतानाच्या प्रतिकूल परिस्थितीतही मला आठवतात ते त्यांचे प्रेरणादायी शब्द आणि लढाऊ बाणा. केमो थेरपी नंतरही आपले उच्चार कसे स्वच्छ व परिपूर्ण आणि स्पष्ट आहेत हे दर्शविण्यासाठी त्यांनी सेटवर आम्हाला संस्कृतमधील २ श्लोक बोलून दाखविले. त्यांच्या या असाध्य कृतीबद्दल आम्ही सर्वांनी त्यांना टाळ्या वाजवत मानवंदना दिली. ते प्रेमाने मला ‘डिकरी’ म्हणून हाक मारत. गुजरातीत डिकरी म्हणजे मुलगी. खूप आठवणी, खूप छान गोष्टी आहेत लिहायला. गेल्या १३ वर्षांपासून त्यांची ओळख होती आणि त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत असेल याची मला खात्री आहे. मला आशा आहे की ते आता चांगल्या ठिकाणी आहेत. त्यांच्या येण्याने आज स्वर्ग उजळला असेल”, असे त्यांची सहकलाकार मुनमुन दत्ताने भावनाविवश होत सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
तन्मय वेकारिया (बागा)ने दिली प्रतिक्रिया -
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील नट्टू काका यांचा पुतण्या झालेला बागा म्हणजेच अभिनेता तन्मय वेकारिया याने सर्वात जास्त सीन्स त्यांच्यासोबत केले आहेत. त्यामुळे त्या दोघांचे खूपच चांगले बॉण्डिंग झाले होते. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तन्मय वेकारिया म्हणाला, ‘खऱ्या आयुष्यातही ते मला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवत. ते गेले २-३ महिने असह्य वेदनांमध्ये होते. मी त्यांच्या मुलाच्या संपर्कात होतो. तो मला सांगायचा की त्याच्या वडिलांना खाणे पिणेही अशक्यप्राय झाले होते आणि त्यांना खूप वेदना होत होत्या. त्यांना गिळतानाही खूप त्रास होत होता. माझ्या हृदयाच्या जवळ असलेले घनश्याम नायक देवाघरी गेल्यामुळे माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे हे निश्चित.’
हेही वाचा - सुपरस्टार शाहरुख खान म्हणाला होता... आर्यन ‘बॅड बॉय’ झालेला मला नक्की आवडेल