गेल्या वर्षीपासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने मनोरंजनसृष्टीतील गणितं बिघडवून टाकलीयेत. या महामारीमुळे वेळोवेळी लादण्यात आलेल्या लॉकडाउन्समुळे चित्रपटगृहांना टाळे लावण्यात आले. मध्यंतरीच्या काळातील काही महिने वगळता सिनेमाहॉल्स गेली दीडेक वर्षे बंदच आहेत. ‘शो मस्ट गो ऑन’ ची कास धरत सिनेसृष्टीने यावर ओटीटी वर चित्रपट प्रदर्शित करण्याचा तोडगा काढला असला तरी बहुतांश फिल्म इंडस्ट्रीला आपले चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित व्हावे असे वाटतेय. असो. डिजिटल प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार नवीन चित्रपट आहे रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित आणि राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘तूफान’. या चित्रपटात फरहान अख्तर समवेत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक शहा आणि हुसेन दलाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. एकाचवेळी हिंदी आणि इंग्रजीत अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होणारी तुफान ही पहिलीच फिल्म असून चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.
अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या सहकार्याने एक्सेल एन्टरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्सच्या साथीने प्रस्तुत, रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित ‘तूफान’ प्रेरणादायक खेळकथा आहे. त्याच्या धडाकेबाज ट्रेलरमध्ये मुंबईतील एका स्थानिक गुंडाच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडते. हा अज्जू भाई व्यावसायिक बॉक्सर अझीझ अली बनतो. ‘तूफान’ कथानक आशा, आस्था आणि अंतर्गत ऊर्जा, जी पुढे जाऊन जिद्द आणि चिकाटीत परावर्तित होते. ही एक प्रेरणादायी कथा आहे. गरीबी आणि मागास परिस्थितीत पिचलेला नायक देशाचा आदर्श होतो. तो वाम मार्ग सोडतो आणि योग्य दिशा अंगीकारतो. दबावाच्या परिस्थितीत डोंगरीच्या रस्त्यावर एका अनाथ मुलाचा जन्म होतो. मोठेपणी हा स्थानिक गुंड बनतो. त्याची ओळख अनन्यासोबत होते जी त्याला योग्य मार्ग दाखवते आणि त्याचे जीवनच बदलून जाते. एक जागतिक किर्तीचा बॉक्सर म्हणून त्याला लौकिक मिळतो. तुफानची कथा मुंबईत आकार घेते.
चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यामते नायक आणि नायिकेनंतर मुंबई शहर या कथानकाची तिसरी व्यक्तिरेखा आहे. मुंबईला स्वत:चा बाज आहे, ते भारतातील बड्या शहरांपैकी एक आहे. या शहरात सर्व जाती-धर्म एक होऊन नांदतो. त्यामुळे विविध संस्कृती आणि धर्माचा हा मेल्टिंग पॉट मानला जातो. मुंबईची ही “शान” नक्कीच अभिमानास्पद आहे. आपल्या व्यक्तिरेखा सिनेमांच्या आधारे मुंबईचे दर्शन घडवताना दिसतील.
मुख्य भूमिकेच्या व्यक्तिरेखेत शिरण्याचा अनुभव किती आव्हानात्मक होता हे यावेळी फरहान अख्तरने सांगितले की, ‘ बॉक्सिंग हा खेळ शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुमची कसोटी पाहणारा खेळ आहे. या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत शिरताना मला ८ ते ९ महिने अविश्रांत कष्ट घ्यावे लागले. मी ‘तूफान’ च्या खऱ्या अर्थाने प्रेमात आहे. एखादी व्यक्ती शरीराने कितीही बळकट असली तरीही बॉक्सर बनणे हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे. आम्ही घेतलेली मेहनत स्क्रीनवर पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे.”
मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर म्हणाली की, “माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर इतक्या उत्तम कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा, परेश रावल आणि फरहान अख्तर यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणे. सात वर्षांपूर्वी राकेश यांनी फेसबुक मेसेज पाठवून माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, हे मला आठवते. आज ते प्रत्यक्षात घडते आहे. अशा रोमांचक सिनेमाचा भाग असल्याने खूप ‘भारी’ वाटतेय.”
सुप्रसिद्ध अष्टपैलू अभिनेता परेश रावल म्हणाला की, “‘तूफान’ प्रत्येक टप्प्यावर आव्हान देणारा आहे. एखाद्याने हार पत्करू नये हे सांगणारा आहे. हा एक परिपूर्ण मनोरंजनपट आहे. त्यात थरार आहे, विचार प्रवर्तक आहे आणि प्रेरणा देणारा ठरेल. एका बॉक्सिंग प्रशिक्षकाची भूमिका निभावणे फारच आव्हानात्मक होते. एक अभिनेता म्हणून मला प्रोत्साहन मिळाले. राकेशने आणि फरहान त्यांचे बेस्ट काम लोकांसमोर ठेवले आहे ते आणि प्रेक्षकांना निश्चित आवडेल अशी खात्री वाटते.”
या सिनेमात मुख्य भूमिकेत फरहान अख्तर असून त्याच्या सोबत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज झळकणार आहेत. या सिनेमाला राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे दिग्दर्शन लाभले आहे. एकाचवेळी हिंदी आणि इंग्रजीत अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणारा ‘समर ब्लॉकबस्टर’ ‘तूफान’ हा पहिलाच चित्रपट असून १६ जुलै २०२१ पासून भारतासह २४० देशांत याचा प्रीमियर होऊ घातला आहे.