मालिका, चित्रपट आणि त्यातील घटना प्रेक्षकांना भारावत असतात म्हणूनच त्यांना समाजाचा आरसा म्हटले जाते. बऱ्याचदा मालिका आणि त्यामधील पात्र ही प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होऊन जातात. त्या पात्रांच्या सुख-दु:खात प्रेक्षक अगदी समरसून जातात. मालिकेत घडतात, साहजिकच चांगल्या गोष्टी, तशा गोष्टी आपल्याही आयुष्यात घडाव्या असे त्यांचे वाटणे गैर नाही. स्टार प्रवाह वरील मालिका ‘मुलगी झाली हो’च्या चाहत्याने मालिका पाहून हुबेहुब आपल्या लेकीचं बारसं केलं आणि मालिकेतीलच नावही ठेवलं साजिरी.
स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका आवर्जून पहातात असे मुंबईतील गोरेगाव येथे रहाणारं साटेलकर कुटुंब. ‘मुलगी झाली हो’ ही मालिका त्यांच्या अत्यंत आवडीची आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेत माऊच्या बारश्याचा प्रसंग दाखवण्यात आला. माऊचे बाबा म्हणजेच विलास पाटील यांना आपली चूक उमजल्यानंतर खुल्या दिलाने त्यांनी माऊचा स्वीकार केला. इतकंच नाही तर तिला घरात हक्काचं स्थान देत तिचं साजिरी असं नामकरणही केलं. मालिकेतला हा भावनिक प्रसंग अंगावर रोमांचं उभं करणारा होता. साटेलकर दाम्पत्याला काही दिवसांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला. मालिकेतल्या माऊच्या बारश्याच्या प्रसंगाने ते इतके भारावून गेले होते की मालिकेप्रमाणेचे अगदी हुबेहुब दिवे उजळून त्यांनी आपल्या लेकीचं नामकरणही साजिरी असं केलं.
मालिकेत विलास पाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या किरण माने यांना साटेलकर कुटुंबाने बारश्याचे खास फोटो पाठवले. हे फोटो पाहून किरण माने भारावून गेले. आपला एखाद्या एपिसोडचा किंवा सीनचा एवढा प्रभाव पडावा हे खूप आनंद देणारं आहे. आता आयुष्यभर जेव्हा जेव्हा या गोड गोजिरीला तिच्या नावाविषयी विचारलं जाईल तेव्हा तेव्हा ‘मुलगी झाली हो’ मालिकेची आठवण निघत राहिल. हे सर्व भारावून टाकणारं आहे अशी भावना अभिनेते किरण माने यांनी व्यक्त केली.
‘मुलगी झाली हो’ मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - सोनालीने 'दुबई'च्या 'गोजिरवाण्या घरात' मांडला सुखाचा संसार