मुंबई - मनोरंजनसृष्टीत विनोदी अभिनेत्री फार कमी आहेत. तसेच ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ हा प्रकार देखील फारच कमी स्त्री कलाकार हाताळताना दिसतात. परंतु तृप्ती खामकर एक उत्तम विनोदी अभिनेत्री तर आहेच परंतु तिचे ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ ॲक्ट्स प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. तृप्ती विविधांगी भूमिका साकारत असते आणि लहानश्या भूमिकेतूनही आपली छाप सोडत असते. नुकताच तिला एक सुखद अनुभव मिळाला ‘गिरगिट’ ही वेब सिरीज करताना. ‘माझ्या २३-२४ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मला मुख्य भूमिका साकारायला मिळाली. त्याबद्दल आनंदच आहे. माही नावाची ही मुलगी अतिशय छान आहे, निरागस आहे आणि सर्वांवर प्रेम करणारी आहे. मेहनतीवर तिचा विश्वास आहे आणि तिला सर्व जग सुंदर वाटते. ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली आणि माझे सांभाळून घेणारे सहकलाकार आणि समजून घेणारे व समजावून सांगणारे दिग्दर्शक यांची मी ऋणी आहे. खरंतर आम्ही एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे राहत होतो आणि शूटिंग दरम्यान काहीही वंगाळ घडले नाही यावरून कल्पना येईल आमच्या सर्वांच्या बॉण्डची. एकंदरीत माझा अनुभव सुखावह होता’, असे तृप्तीने सांगितले.
मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये वेगळेपण जाणवले का याबद्दल तृप्ती म्हणाली, ‘खरं सांगायचं तर वेगळेपण काहीही नाही, भाषा सोडली तर. सर्वकडे उत्तम काम करण्याकडे सर्वांचा ओढा असतो. प्रत्येक काम वेगळंच असतं तरीही काम हे कामच असतं, कुठल्याही भाषेतील. प्रत्येक कलाकाराला सन्मानाने वागविलं जात, म्हणजे मला तरी अजून कधीच वाईट अनुभव आलेला नाही. मी नाटक केल्यामुळे भूमिका साकारायला मदत होते आणि याची जाणीव सेटवरील प्रत्येकाला असते. म्हणजे कुठल्याही भाषेतील नाटक केलेला नट थोडा फार उजवा ठरतो. महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचं काम बोलतं. कोण कुठला भाषिक आहे यावरून कुठलाही भेदभाव केला जात नाही.’
‘गिरगिट’ सिरीजबद्दल बोलताना तृप्ती खामकर म्हणाली, ‘कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळा आला होता. त्यामुळे या सीरिजसाठी मनाली ला आल्यावर सर्व मानसिक मरगळ झटकली गेली. मनाली च्या अप्रतिम निसर्गसौंदर्यात वावरताना मन उल्हसित झालं होतं. त्यातच आमचा संपूर्ण चमू प्रोफेशनली शूट उरकत होता. मी तर बाप्पाचे आभार मानले कारण मला इतक्या महिन्यांनंतर घराबाहेर पडता आलं.’ लॉकडाऊन मधील अनुभवाबद्दल सांगताना तृप्ती म्हणाली, ‘मी स्टॅन्ड अप कॉमेडी करीत असल्यामुळे मी लॉकडाऊन चा उपयोग लिखाणासाठी केला. निरनिराळी कॅरेक्टर्स, स्किट्स लिहिली. तसेच काही ‘पेड पार्टनरशिप्स’ साठी काम केलं. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ने ‘झोंबिवली’ मध्ये मला एक सुंदर भूमिका दिली, त्याचे शूट केले. तसेच धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गोविंदा नाम मेरा’ साठीदेखील चित्रीकरण केले. मनापासून काही हवे ते मागितलं तर ते नक्कीच आपल्या ओंजळीत पडते हे माझ्याबाबतीत खरं ठरले. एकंदरीत माझा लॉकडाऊन सत्कारणी लागणारा ठरला, असेही तृप्ती खामकर म्हणाली.
गिरगिट ही एक मर्डर मिस्टरी थ्रिलर वेब सिरीज आहे, जी प्रत्येक भागात उत्सुकता वाढवत ठेवते. 7 भागांची ही सिरीज अल्ट बालाजीची पेशकश असून ती अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयरवर उपलब्ध आहे ज्यात मराठमोळी तृप्ती खामकर मध्यवर्ती भूमिकेत आहे.
हे ही वाचा - Rajkummar Rao-Patralekhaa engaged : राजकुमार राव-पत्रलेखाचा साखरपुडा