‘पंढरीची वारी’ हा महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा आहे. दरवर्षी पहिल्या पावसासोबतच वारक-यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेध लागतात. यंदा करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची वारी थांबली असली तरी भक्तीची परंपरांगत वहिवाट थांबलेली नाही. ‘यंदाची वारी मनोरंजनाच्या दारी’ येत विठ्ठल भेटीचा मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे.
‘रिदमिका इव्हेंट कंपनी’च्या सौजन्याने अभंग आणि काव्य रचनेतून विठू माऊलीचा गजर खास व्हर्च्युअल माध्यमातून रंगणार आहे. ‘गजर विठू माऊलीचा’..! या सांगीतिक कार्यक्रमातून ही ऑनलाइन वारी भक्तांना शनिवार ४ जुलैला अनुभवता येणार आहे. ही वारी यूएसएला सकाळी १०.३०वा., कॅनडा मध्ये दुपारी ३.३०वा., युके व युएईमध्ये सायंकाळी ६.३०वा., आणि संपूर्ण भारतात ८:००वा. तुमच्या भेटीला येणार आहे.
या दिंडी मधील वारकरी ह. भ. प. ज्ञानेश्वर मेश्राम आणि त्यांचा संच निरूपण करणार असून सूत्रसंचलनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत केळकर सांभाळणार आहे.जनसामान्यांचे रंजन हे कलाकाराचे कर्तव्य! या कठीण काळात मनोरंजनाच्या माध्यमातून प्रत्येकाला जगण्याची ऊर्जा मिळावी, आनंदाचे काही क्षण लाभावे यासाठी मनोरंजनाच्या यज्ञात हे आगळेवेगळे पुष्प अर्पण करण्यासाठी सचिन भांगरे यांच्या पुढाकाराने व ‘रिदमिका इव्हेंट कंपनी’च्या सहकार्याने अनोख्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.