चंद्रपूर : कोरोनामुळे हिंदी राज्यनाट्य स्पर्धेचा निकाल सध्या रखडलेला आहे. मुंबई विभागाची नाटके सादर होऊ शकले नसल्याची सबब देत हा निकाल थांबवण्यात आलाय. मात्र, सध्या मुंबईत कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसेंदिवस त्यात कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. अशावेळी उर्वरित नाटकांचे सादरीकरण हे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे निकालाला ताटकळत न ठेवता. हा निकाल जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे एक निवेदन देखील देण्यात आले आहे. कोरोना काळाचा फटका समाजातील इतर घटकांसह नाटक व मनोरंजन क्षेत्रालाही बसला आहे. या क्षेत्रात कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. दुसरीकडे फिजिकल डिस्टन्सिंगचा मुद्दा असल्याने राज्यातील सांस्कृतिक रंगमंच- नाट्यगृहे सुरू होण्याची दूरपर्यंत शक्यता नाही. अशा स्थितीत राज्य शासनातर्फे आयोजित होणाऱ्या हौशी व प्रायोगिक नाट्य स्पर्धानाही या स्थितीचा फटका बसला आहे. राज्य शासनाच्या वतीने 59वी हिंदी राज्य नाट्य स्पर्धा यंदा सादर झाली. मात्र कोरोनाचे संकट ओढवल्याने ही स्पर्धा पूर्ण होऊ शकली नाही.
85 नाटकांपैकी तब्बल 60 नाटकांचे सादरीकरण झाले. सादरीकरण रखडलेली बहुतांश नाटके मुंबई येथील आहेत. मुंबईतील कोरोनाचा उद्रेक बघता आता या नाटकांचे सादरीकरण जवळ-जवळ अशक्य आहे. म्हणूनच सादर झालेल्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या परीक्षणावरून अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी राज्यातील हौशी नाट्य कलाकारांनी केली आहे. यासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे एक निवेदन देखील देण्यात आले आहे. याशिवाय मराठी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक व अंतिम यासह हिंदी स्पर्धेतील सादरीकरणाची रक्कम देखील रखडली आहे. 59 व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल तातडीने जाहीर करत रखडलेली रक्कम देण्याची मागणी कलाकारांनी निवेदनाद्वारे पुढे रेटली आहे.