मुंबई - इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिल (आयएफटीपीसी) (IFTPC) ने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘ब्रेक द चेन’ आवाहनाला पाठिंबा दर्शविला असून त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी घेतलेला पुढाकार नक्कीच यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली आहे. आयएफटीपीसी ने आपल्या सर्व सदस्यांना शासनाची मार्गदर्शक सूची पाळण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून कोरोनाचा प्रसार थांबविण्यास मदत होईल. यामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी पुढचे १५ दिवस पूर्णतः बंद राहील. परंतु त्यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना एक विनंतीही करण्यात आली आहे. ज्यात त्यांनी मागण्यांचा गांभीर्याने आणि सजगपणे विचार करावा ही विनंती करण्यात आली आहे.
गरजूंना जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये मनोरंजनसृष्टीतील कामगार, तंत्रज्ञ आणि कलाकारांचा उल्लेख नाही. या योजनेत कामगार आणि कलाकारांचा समावेश करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. त्यासाठी कामगारांची आणि कलाकारांची यादी संपूर्ण तपशिलासह एकत्र देऊ शकतो. फिल्म सिटी आणि मीरा-भाईंदर, ठाणे, नायगाव येथे लसीकरण केंद्रे उभारावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
आमचा विश्वास आहे की भयानक कोरोनाबरोबरचा लढा बराच काळापर्यंत लढावा लागणार आहे. म्हणूनच आम्ही यावर आधीच काम सुरू केले आहे आणि येत्या काही दिवसांत या उद्योगासाठी सविस्तर ‘ऑपरेशनल प्लॅन’ सादर करणार आहोत. सध्याच्या लॉकडाऊनला आम्ही राज्य सरकारला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यासंदर्भात योजना आखण्यासाठी तुमच्या सहाय्याची गरज भासेल. या परिस्थितीत प्रेक्षकांचे दर्जेदार करमणूक करताना या क्षेत्रातील लोकांच्या कल्याणासाठीही विचार केला पाहिजे. आमचे काम आणि त्याचे स्वरूप न्यूज चॅनेलसारखेच आहे. त्यामुळे आमचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करावा.
हे निवेदन श्री. जेडी मजिठिया (संयोजक-सीसीएमईआय) -चेयरमन (टीव्ही-डब्ल्यूईबी) आयएफटीपीसी यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र, श्री उद्धव जी ठाकरे यांना पाठविले आहे. त्यांना खालील को-ऑर्डिनेशन कमिटीचा पाठिंबा आहे.
को-ऑर्डिनेशन कमिटी....
समन्वय समितीचे सदस्य : डॉ अमोल कोल्हे, आमदार, श्री आदेश बांदेकर, श्री गौरव बॅनर्जी-स्टार टीव्ही, श्री. दानिश खान-सोनी टीव्ही, श्री. अमित शाह-झी टीव्ही, सुश्री मनीषा शर्मा-कलर्स, श्री. टी.पी. अग्रवाल-अध्यक्ष, इम्पा, श्री संग्राम शिर्के-अध्यक्ष, डब्ल्यूआयएफपीए, श्री. नितीन वैद्य-संचालक-आयएफटीपीसी, श्री. नितीन तेज आहुजा-मुख्य कार्यकारी अधिकारी, पीजीआय, श्री शोक पंडित-अध्यक्ष-आयएफटीडीए, श्री अशोक दुबे-जनरल सेक्रेटरी-एफडब्ल्यूईसी आणि श्री. अमित बहेल-संयुक्त सचिव, सिंटा.