कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रातून विस्थापित झालेली टेलिव्हिजन मालिकांमधील मंडळी पुन्हा ‘माहेरी’ परतताना दिसताहेत. परराज्यात शूटिंगसाठी पोहोचलेल्या मालिकेच्या टीम्स आता मुंबईत पुन्हा शुटिंग्स सुरु करणार आहेत. आता नवीन नियमावलीनुसार मुंबईमध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली असल्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ चे विनोदवीर सुद्धा मुंबईमध्ये शूटींगसाठी सज्ज झाले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित झालं होतं. पण प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या झी मराठी वरील लाडक्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अजूनही काही मालिकांचं चित्रीकरण सुरु आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये म्हणून हा खटाटोप. सर्वत्र निगेटिव्हिटी पसरलेली असताना, या कठीण वेळी, सगळ्यांना हसवण्याचा विडा घेतलेले महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर आणि प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या जयपूरमध्ये शूटिंगसाठी रवाना झाला होता.
परंतु आता ‘चला हवा येऊ द्या’ चं चित्रीकरण पुन्हा मुंबईत सुरु होत आहे. तसंच काही कारणांमुळे जयपूरला चित्रीकरणासाठी न गेलेले डॉक्टर निलेश साबळे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे आता नवीन भागांतून प्रेक्षकांच्या भेटीस येतील. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ चे जुने आणि नुकतेच सहभागी झालेले नवीन विनोदवीर प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या आगामी भागांत भाऊ कदम राक्षस बनून प्रेक्षकांना हसवणार आहे तर सागर कारंडे साकारणारा पोस्टमन काका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - मरुनही जगेल मी... राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संचारी विजय मृत्यूनंतरही अवयवदानातून राहणार जीवंत