आपल्या आयुष्यात शिक्षणाचं फार महत्व आहे. मात्र, शिक्षणाच्या वाटेवर चालत असताना आपल्याला योग्य मार्ग दाखणारा हा शिक्षक असतो. शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 'शिक्षक दिना'व्यतिरिक्त आणखी कोणता होऊ शकतो.. कलाविश्वातही शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं उलगडणारे बरेचसे चित्रपट तयार होत असतात. रोमॅन्टिक, मसालापट असलेल्या चित्रपटांशिवाय बॉलिवूडमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं पडद्यावर पाहायला मिळते.
या चित्रपटातून आपल्याही शाळा आणि महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी ताज्या होत असतात. चला तर मग शिक्षक दिनानिमित्त जाणून घेऊयात अशाच काही चित्रपटांबद्दल...
'सुपर ३०'
अलिकडेच बिहारचे गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हृतिक रोशनने यामध्ये आनंद कुमारांची भूमिका साकारली होती. आनंद कुमारांनी ज्याप्रकारे विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतली, याचा प्रवास सुपर ३० मध्ये उलगडला आहे.
'हिचकी'
राणी मुखर्जीच्या 'हिचकी' चित्रपटातही रानी शिक्षिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाली. यामध्ये तिला टॉरेटेस सिंड्रोम नावाचा आजार असतो. २००८ साली हॉलिवूडमध्ये तयार झालेल्या 'फ्रंट ऑफ द क्लास' या चित्रपटावर 'हिचकी' आधारित होता. हे दोन्हीही चित्रपट अमेरिकेचा प्रेरणादायी वक्ता आणि शिक्षक असलेल्या ब्रॅड कोचेन यांच्या पुस्तकावर आधारित होते. यामध्ये त्याच्या संघर्षाची कथा उलगडण्यात आली होती.
'आरक्षण'
२०११ मध्ये प्रकाश झा यांचा 'आरक्षण' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दाखवण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटामध्ये डॉ. प्रभाकर आनंद या मुख्यध्यापकाची भूमिका साकारली होती.
'३ इडियट्स'
२००९ साली '३ इडियट्स' या चित्रपटानेही प्रेक्षकांची मने जिंकली होती. मनोरंजनासोबतच या चित्रपटात एक संदेशही देण्यात आला होता. फक्त परिक्षेत मिळालेले गुणंच नाही तर तुमची कला तुम्हाला पुढे घेऊन जाते, हा संदेश यामध्ये देण्यात आला होता.
'तारे जमीन पर'
आमिर खानच्याच 'तारे जमीन पर' या चित्रपटानेही शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं अतिशय सुंदररित्या पडद्यावर उलगडलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही भरभरुन प्रतिसाद मिळाला होता.
'ब्लॅक'
२००५ साली संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांची भूमिका पाहायला मिळाली. या चित्रपटानेही सर्वांची प्रशंसा मिळवली होती.
'इकबाल'
२००५ सालीच 'इकबाल' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. यामध्ये एक मुलगा क्रिकेटवेडा असतो. श्रेयस तळपदे आणि नासिरुद्दीन शाह यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती.