मुंबई - आई काळुबाई मालिकेतून आपल्याला काढण्यात आले नाही, तर मी स्वतः ही मालिका सोडली असल्याचा दावा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने केला आहे. आई काळुबाई या मालिकेत प्राजक्ता गायकवाड काम करत होती. मात्र मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी प्राजक्तावर अनेक आरोप करत तिला मालिकेतून काढून टाकल्याचं नुकतंच जाहीर केलं होतं. त्यावर प्राजक्ताने स्पष्टीकरण दिले आहे....
विवेक सांगळेंकडून शिवीगाळ....
अलका कुबल या माझ्या आई समान आहेत. मात्र त्या मला बदनाम करत असल्याचा आरोप प्राजक्ता गायकवाड हिने केला आहे. बुधवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा या कार्यक्रमात प्राजक्ता गायकवाड सहभागी झाली होती. त्यावेळी तिने या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. मला मालिकेतून काढले नाही मीच मालिका सोडली. मला विवेक सांगळे यांच्याकडून शिवीगाळ झाली. माझ्या आईबद्दल अपशब्द काढले गेले, यासंदर्भात निर्मात्या अलका कुबल यांना मी माहिती दिली होती. मात्र त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. मालिका सुरू ठेवण्यासाठी अलका कुबल नराधमांना पाठीशी घालत आहेत. अलका कुबल यांना देखील दोन मुली आहेत. त्यांच्या मुलीसोबत असा प्रकार झाला असता तर, त्या अशाच वागल्या असत्या का, असा प्रश्न देखील प्राजक्ता गायकवाड हिने या वेळेस उपस्थित केला.
अलका कुबल यांचे आरोप निराधार....
मी मालिका सोडल्यानंतर आता अलका कुबल यांनी मला मालिकेतून काढण्यात आल्याचे सांगितले. माझ्यावर विविध आरोप केले गेले, माझी लाज काढली गेली, मात्र माझ्यामुळे मी कधीही शूटिंग थांबू दिलं नाही. मी इव्हेंटची सुपारी घेते, असा आरोप अलका कुबल यांनी केला, त्यातही तथ्य नाही. या मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता. तसेच मला रक्त लागलेली साडी घालण्यासाठी दिली गेली होती. माझ्या आईने त्याविषयी विचारले असता त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटलं गेलं, असे प्राजक्ता यावेळी म्हणाली. अलकाताई माझ्यासाठी आईसारख्या आहेत, मात्र त्या नराधमांना पाठीशी घालतात, माझी बदनामी करतात, मला या सीरियलचे आतापर्यंत एक दिवसाचेही पेमेंट मिळालेले नाही, असेहा यावेळी प्राजक्ता म्हणाली.