मुंबई - महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरु होण्याची घोषणा झाल्यावर चित्रपट प्रदर्शनाची लगबग सुरु झाली आहे. हिंदी बरोबरच मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी रांगेत आहेत. यात आहे संजय लक्ष्मणराव यादव सहनिर्मित मराठी चित्रपट ‘अलिप्त’. इतर मराठी चित्रपट निर्मात्यांनी आस्ते कदम भूमिका घेतलेली असताना ‘अलिप्त’ ने मात्र चित्रपटगृहात प्रदर्शनाची तयारी पूर्ण केली आहे.
संजय लक्ष्मणराव यादव यांच्याकडे मराठी चित्रपट सृष्टीतील एक जिद्दी निर्माता म्हणून पाहिले जाते. चित्रपटाच्या प्रत्येक अंगाची माहिती जाणून घेऊन, प्रत्येक कामात अभ्यास करुन एक एक पाऊल विचारपूर्वक टाकत त्यांनी ‘अलिप्त’ पूर्ण केला आहे.
या चित्रपटाचे निर्माते अनिकेत कारंजकर असून त्यांचा हा तिसरा चित्रपट असून यापूर्वी त्यांनी ‘धो धो पावसातील वन डे मॅच’ आणि ‘जजमेंट’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली आहे. शिवाय के अनिकेत या नावाने त्यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून अनेक चित्रपटांवर काम केले आहे. "अलिप्त" या चित्रपटाचे छायाचित्रणही त्यांनीच केले आहे. ‘अलिप्त’ चे दिग्दर्शन मनोज येरुणकर यांनी केले असून या थरारक रहस्यमय चित्रपटात सुशांत शेलार, स्वप्नील जाधव, तन्वी हेगडे, शरयू सोनावणे, भूषण घाडी, सुनील देव यांच्या भूमिका आहेत.
संजय यादव बोलताना म्हणाले की, "पाझर या शॉर्ट फिल्म च्या निमिताने मी चित्रपटसृष्टीत आलो. या शॉर्ट फिल्मला अनेक फेस्टीवलमध्ये पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सध्या संजू एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत, कटिंग चाय प्रॉडक्शन निर्मित ‘अलिप्त’ चित्रपटावर फोकस केला आहे. लॉकडाऊन नंतर पहिल्याच प्रयत्नात आमचा चित्रपट रिलीज होतोय याचा आनंद आहेच. शिवाय या चित्रपटाची टीम आणि मार्गदर्शन करणारी टीम यातून चांगली माणसे भेटली याचा आनंद आहे. प्रेक्षकांना लवकरच हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात पहायला मिळेल आणि चित्रपट रिलीज करण्यासाठी आमची धावपळ सुरु आहे.
‘अलिप्त’ चे निर्माते अनिकेत कारंजकर म्हणाले, ‘’अलिप्त’ ची निर्मिती आणि छायाचित्रकार म्हणूनही मी काम केले आहे. या चित्रपटात थरारक घटनाक्रम, खिळवून ठेवणारे कथानक, कलाकारांचा दमदार अभिनय या गोष्टींमुळे चित्रपट चांगला बनला आहे.
‘अलिप्त’ हा चित्रपट येत्या २९ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फास्टट्रैक एन्टरटेन्मेन्ट आणि इलान आर्ट करीत आहेत.