मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांचे आज मुंबईत निधन झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. मुंबईच्या सांताक्रुझ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
वीरू देवगन हे सुप्रसिद्ध स्टंट आणि अॅक्शन कोरियोग्राफर होते. त्यांनी जवळपास १५० पेक्षा जास्त चित्रपटाच अॅक्शन कोरियोग्राफीचे काम केले आहे. याशिवाय त्यांनी 'हिंदुस्तान की कसम' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले 'फुल और कांटे', 'हिम्मतवाला', 'प्रेम रोग', 'क्रांती', 'दो और दो पांच' हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. यापैकी 'फुल और कांटे' चित्रपटातूनच अजय देवगनने बॉलिवूड पदार्पण केले होते.
अॅक्शन आणि दिग्दर्शनासोबतच वीरू देवगन हे एक उत्तम अभिनेते होते. क्रांती, सौरभ आणि सिंहासन सारख्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
अलिकडेच अजय देवगनच्या 'टोटल धमाल' चित्रपटाच्या स्क्रिनींग दरम्यान त्यांनी हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर त्यांची तब्येत खालावली. त्यामुळेचे अजय देवगनने त्याच्या 'दे दे प्यार दे' चित्रपटाचे प्रमोशन केले नाही. त्यांच्या प्रकृतीविषयी तो चिंतेत होता.
वीरू देवगन यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळी ६ वाजता विले पार्ले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.