मुंबई - ‘हम साफ साफ हैं’, ‘एक शृंगार-स्वाभिमान’, ‘पिया अलबेला’ सारख्या मालिकांमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री गुल्की जोशी सध्या 'मॅडम सर' या मालिकेत हसीना मलिक म्हणून प्रेक्षकांना आवडतेय. ती मालिकेमध्ये नीडर, पण संवेदनशील व स्मार्ट पोलिसाची भूमिका साकारत आहे. आपल्या व्यक्तिरेखेत बारकावे भारत ती ही भूमिका साकारत असल्याने प्रेक्षकांना ती खूप जवळची वाटते. तिने तिच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेरित करत आणि रूढींना मोडून काढत त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या वर्षी गुल्की कोविडच्या विळख्यात अडकली होती. आजारपणानंतर तिने पुन्हा शूटिंग सुरू केले. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि शूटिंग करताना कलाकारांची स्थिती खराब होत असते. गुल्की जोशीने उन्हाळ्यात उकाड्यावर मात करण्याबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
''मुंबईमध्ये उन्हाळा अधिक उष्ण असण्यासोबत दमटही असतो. सारखा घाम येतो, म्हणून मी काही गोष्टी न विसरता सोबत ठेवते. स्वत:ला उत्साहित व सजल ठेवण्यासाठी मी पाणी, ज्यूस व इतर द्रवपदार्थांचे सेवन करते. तसेच नेहमीचे जेवण कमी करते. जास्तीत जास्त ‘लिक्विड डायट’ ठेवते. शहाळ्याचं पाणी उन्हाळ्यातील माझे फेव्हरेट पेय आहे. तसेच मी व्हरायटी म्हणून कधीकधी निरनिराळे मिल्क-शेक्स पीत असते. उन्हाळ्यात मी शक्यतो सुती कपडे घालते, जे सुटसुटीत असतील. एकंदरीत या मोसमात माझी स्टाईल साधी पण लक्षवेधक ठेवते," उन्हाळ्यातील तिच्या नित्यक्रमाबाबत गुल्कीने सांगितले.
“उन्हाळ्यामध्ये मी काही विशिष्ट गोष्टींचा अवलंब करते. मी माझ्यासोबत व्हिटॅमिन सी टॅब्लेट्स, बॉडी स्प्रे, सनस्क्रिन लोशन आणि लहान पोर्टेबल पंखा ठेवते. मी दुपारच्या वेळी घराबाहेर पडायचे टाळते, किंबहुना पडतच नाही. पण, घराबाहेर पडलेच तर सोबत छत्री, वॉटर स्प्रेची लहान बॉटल, कलिंगड, टरबूज सारखी फळे सोबत ठेवते जी शरीराला थंडावा देतात. मी शरीरावर अधिक प्रमाणात सनस्क्रिन लावते आणि शक्यतो थेट सूर्यप्रकाश टाळते," असेही ती म्हणाली.
उन्हाळ्यातील सुट्टयांसंबंधित आठवणींना उजाळा देत गुल्की म्हणाली, ''मला उन्हाळ्यामध्ये डोंगर व टेकड्यांवर जायला आवडते. मी वर्षातून किमान एकदा टेकड्यांवर सहलीसाठी किंवा ट्रेकवर जाते. बालपणी उन्हाळा मला खूप आवडायचा, कारण मला मनसोक्तपणे आंबे खायला मिळायचे. उन्हाळ्याशी संबंधित माझ्या बालपणीच्या आठवणी आंब्यांशिवाय अपु-या आहेत.''