मुंबई - मराठी सिने-नाट्यसृष्टी ही कायमच प्रयोगशील मानली गेली आहे. त्यामुळेच मराठी मालिकांच्या सादरीकरणात कायम वेगवेगळे प्रयोग होत असताना आपण पाहतो. सध्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील सगळी शूटिंग दोन महिन्यांपासून बंद आहेत. मात्र, यावर उपाय शोधून मालिका तयार करण्याचा निर्णय सोनी मराठी वाहिनीने घेतला आहे.
एकीकडे शूटिंग सुरू व्हायला जुलै महिना उजाडण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे शूटिंग सुरू झाली तरीही त्यात नक्की काय नियम ठेवायचे आणि कोणते नियम वगळायचे यावर सिंटा आणि फिल्म वर्कर्स फेडरेशन यांच्यात खल सुरू आहे. त्यानंतर आधी केंद्र आणि मग राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतरच प्रत्यक्ष शूटिंग सुरू होणार आहेत. त्यामुळे, प्रेक्षकांना टीव्हीवर आधी पाहिलेल्या मालिकांचे रिपीट टेलिकास्ट पाहावे लागत आहेत. मात्र, यावरच आता काही मराठी कलाकरांनी नामी उपाय शोधून काढला आहे, तो म्हणजे घरात राहूनच मालिकेचं शूटिंग करण्याचा.
ही भन्नाट आयडिया लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या डोक्यात आली. त्यानंतर इतर कलाकर त्याला जोडले गेले. लॉकडाऊन याच विषयावर आधारित असलेल्या मालिकेचं नाव 'आठशे खिडक्या नऊशे दारं' असं असून त्यात अभिनेते मंगेश कदम आणि लीना भागवत हे मुख्य भूमिकेत असतील. त्यांच्याशिवाय सुव्रत जोशी, सखी गोखले, आनंद इंगळे यांच्यादेखील या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.
विशेष म्हणजे या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा घरात बसूनच या मालिकेत काम करणार असून त्याच्याच घरात या मालिकेचं चित्रीकरणदेखील होणार आहे. त्यासाठी नक्की काय यंत्रणा वापरणार ते मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, अशा पध्दतीने टीव्हीवर सादर होणारी ही फक्त मराठीतील नव्हे तर देशभरातील पहिली मालिका असेल. या मालिकेचं प्रसारण येत्या '18 मे' पासून 'सोनी मराठी' वाहिनीवर होणार असून अशी कल्पना प्रत्यक्षात आणण्याचं धाडस करणारं हे पहिलं चॅनल ठरणार आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन या मालिकेची औपचारिक घोषणा होणार आहे.