महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्यामुळे ‘रंग माझा वेगळा’ च्या टीमने गोव्याची वाट पकडली होती. तेथे नवीन भाग चित्रित करून प्रेक्षकांना मनोरंजनात उणीव भासणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. याबरोबरच लेखकांना मालिकेत रंजकता आणत प्रेक्षकांचा बांधून ठेवणे गरजेचे असते म्हणून मालिकेत अनेक ट्विस्ट्स बघायला मिळतात. त्याच अनुषंगाने स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत अजून एक धक्कादायक ट्विस्ट पाहावयास मिळणार आहे.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा-कार्तिक चा प्रवास घटस्फोटाच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे. सासूबाईंची खंबीर साथ असली तरी कार्तिकचा गैरसमज इतक्या टोकाला गेला आहे की त्याने आता दीपाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दीपावर त्याने जीवापाड प्रेम केलं त्याच दीपापासून विभक्त होण्याचं त्याने ठरवलं आहे. श्वेताच्या षडयंत्राला बळी पडत दीपापासून दूर जाण्याची वेळ कार्तिकवर आली आहे.
सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे. दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने पितृत्व नाकारलं. स्वाभिमानी दीपाने इनामदारांचं घर सोडत एकटं रहाण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीसमोर हतबल न होता ती दररोज नवनवी आव्हानं स्वीकारते आहे. या कठीण काळात सौंदर्या मात्र तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. सासूबाईँच्या आशिर्वादानेच पुढचा प्रवास करण्याचं दीपाने ठरवलं आहे. या सगळ्यात सौंदर्याची प्रतिक्रिया काय असेल, कार्तिकला दीपाच्या खऱ्या प्रेमाची किंमत कळणार का, दीपा या प्रसंगाचा सामना कसा करणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
‘रंग माझा वेगळा’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - काँग्रेस आमदारावर वांशिक टिपण्णी करणाऱ्या यु ट्यूबरवर वरुण धवनसह सेलेब्रिटींची टीका