प्रत्येक वयाची स्वतःची अशी काही गरज असते. शाळेत असताना मित्राची गरज, त्यानंतर मुलींबद्दल वाटणारी ओढ आणि कॉलेजमध्ये पोहोचता पोहोचता प्रेमाचे लागलेले वेध या प्रत्येक टप्प्यावर आयुष्य जगण्यात एक वेगळीच गंमत असते. त्यातच आता तर कॉलेज सुरू झाल्या-झाल्या चर्चा सुरू होते, ती तुला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड आहे की नाही याची. आयुष्यात अशी एखादी खास व्यक्ती असण्याला सद्या फारच महत्त्व आलंय. पण हे सगळे टप्पे ओलांडूनही आयुष्यात ही खास व्यक्ती आलीच नाही तर..?? या तर भोवतीच गर्लफ्रेंड या सिनेमाची गोष्ट आधारित आहे.
सिनेमाचा हिरो आहे नच्या म्हणजेच नचिकेत प्रधान म्हणजेच अमेय वाघ. या नच्याकडे गाडी आहे, बांगला आहे, मित्र मैत्रिणी आहेत, चांगली नोकरी आहे, आई बाबा भाऊपण आहे, नाहीये ती फक्त गर्लफ्रेंड..म्हणजे त्या एका कारणामुळे त्याच आयुष्य अपूर्ण आहे... या नच्याची एकंदर पर्सनॅलिटी पाहता ती त्याला कधी मिळेल ते सांगता येणं अवघड आहे. त्यामुळेच हळूहळू त्याचा भाऊ, मित्र मैत्रीणी सगळेच त्याला यावरून बोलायला लागलेत, एवढंच काय तर ऑफिसमध्ये तो गर्लफ्रेंड कधीच पटवू शकत नाही यावरून लोकांच्या पैजाही लागल्यात. अशाच प्रेशर कुकरमध्ये अडकलेल्या नच्याचा एका वळणावर भावनिक स्फोट होतो आणि मी गर्लफ्रेंड पटवणारच, असा निश्चय तो करतो.. आणि ईथुन पुढे ही गर्लफ्रेंड त्याच्या आयुष्यात नक्की कशी येते आणि पुढे काय काय घडतं ते पाहण्यासाठी मात्र तुम्हाला हा सिनेमा पाहायलाच हवा..
या सिनेमातली सगळ्यात पहिली इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती दिग्दर्शक उपेंद्र सिधयेने शोधलेली नच्याच्या आयुष्यातली ही सिच्युएशन, असे अनेक नच्या आपल्या आजूबाजूला असतात पण आपण कधीही त्यांचाकडे या दृष्टीने पहात नाही. हा नच्या अमेय वाघ याने त्याच्या अदाकारीने अगदीच सहजपणे साकारला आहे. नच्याला सहन करावी लागणारी अवहेलना, मित्रांचे बॉसचे नातेवाईकांचे टोमणे या सगळ्यांने खजील होणारा नच्या त्याने मोठया खुबीने साकारला आहे. सिनेमातली दुसरी आणि तेवढीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती अर्थातच नच्याची गर्लफ्रेंड आलिशा नेरुरकर म्हणजेच सई ताम्हणकर..सई या सिनेमात कमालीची युथफुल तर वाटली आहेच, पण नच्याच्याच नाही तर तिच्या अनेक फॅन्सच्या स्वप्नातली गर्लफ्रेंड बनून सिनेमाभर अतिशय मस्त वावरली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच सिनेमात दिसलेल्या गॅरीच्या दोन्ही शनाया, रसिका सुनील श्वेताच्या आणि इशा केसकर कावेरीच्या भूमिकेत चपखल बसल्या आहेत. सिनेमाभर एकदाही एकमेकींच्या समोरासमोर आल्या नसल्या तरीही त्यांच्या भूमिका नक्कीच वेगवेगळ्या आहेत. याशिवाय यतीन कार्येकर, कविता लाड- मेढेकर, सागर देशमुख, विनीत गोरे, उदय नेने यांनीही आपल्या भूमिका चोख वठवल्या आहेत.
सिनेमाच अजून एक जमेची बाजू म्हणजे त्याच संगीत..हृषीकेश- सौरभ- जसराज या त्रयींनी आपल्या संगीताने सिनेमाला चार चांद लावलेत. नच्या गॉट गर्लफ्रेंड हे तुम्हाला गॅंगनम स्टाईलची आठवण नक्की करून देईल. हे गाणं मस्त जमून आलं आहे. याशिवाय बाकीची 3 गाणीही मस्त जमून आलीत. राहुल आणि सजीव या जोडीने गाण्याची कोरिओग्राफी एवढी सुंदर केली आहे की त्यासाठी ही गाणी पुन्हा पुन्हा पहावी अस वाटत. तर मिलिंद जोग यांच्या अप्रतिम कॅमेरा वर्कमुळे संपूर्ण सिनेमाभर फ्रेम्समधील फ्रेशनेस टिकून राहिला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दिग्दर्शक उपेंद्र सिधयेने त्याच्या पहिल्याच सिनेमातून एक चांगला पण आजच्या युथला अपील होईल, असा विषय मांडलाय. सिनेमाची कथा अनेकदा थोडी जास्तच क्रेझी वाटेलही पण तरीही तो क्रेझिनेस मान्य करून आपण नच्याच्या गोष्टीत हरवून जाऊ.. फर्स्ट हाफमध्ये गर्लफ्रेंडचा शोध लागेपर्यंतचा भाग खरोखरच प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. उत्तरार्धात मात्र सिनेमा बराचसा प्रेडिक्टेबल होऊन गेलाय..मात्र तरीही नच्या- अलिशाची ही प्यार वाली लव स्टोरी आपलं मन जिंकल्याशिवाय रहात नाही..'एक्झॅक्टली हाऊ नच्या गॉट गर्लफ्रेंड' हे जर तुम्हांला जाणून घ्यायचं असेल तर मात्र सिनेमा एकदा नक्की पाहा..