मुंबई - अर्जुन कपूरचा एतिहासिक चित्रपट 'पानीपत'ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात पानीपतचे तिसरे युद्ध पाहायला मिळणार आहे. अफगान आणि मराठ्यांमध्ये हे युद्ध झाले होते. अर्जुन या चित्रपटात मराठा सैन्यदलाचा मुख्य सदाशिवराव भाऊची भूमिका साकारत आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान या देखील भूमिका साकारणार आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, झिनत अमान देखील पानीपतमध्ये झळकणार आहेत. त्या 'सकिना बेगम'च्या भूमिकेत पाहायला मिळतील. सदाशिवरावांना मदत करण्यासाठी सकिना बेगम यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. याच भूमिकेत झिनत अमान यांना पाहता येणार आहे. त्यांचा या चित्रपटाच कॉमियो भूमिका असणार आहे.

झिनत अमान यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या १९८९मध्ये आलेल्या 'गवाही' चित्रपटात काम केले होते. आता 'पानीपत'च्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूर, क्रिती सॅनोन, संजय दत्त, मोहनीश बेहल, कुणाल कपूर आणि पद्मीनी कोल्हापुरे हे कलाकार झळकणार आहेत.
या चित्रपटाचे सध्या राजस्थान येथे शूटिंग सुरू आहे. अर्जुन कपूर या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेत आहे.
या चित्रपटाची निर्मिती सुनिता गोवारीकर आणि रोहित शेलाटकर हे करत आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होईल.