मुंबई - गेल्या वर्षी कोरोना संक्रमण काळात खूप मोठा लॉकडाऊन लागला होता. अनेकांना, खास करून कामगार वर्गाला, आर्थिक फटका बसला होता. अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता ज्यात मनोरंजनसृष्टीतील कलाकार आणि निर्मितीसंस्था होत्या. यावर्षीची कोरोनाची दुसरी लाट अधिक भयानक आहे. व त्यामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू झाला आहे. आणि पुन्हा एकदा कामगारवर्गाच्या कमाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आताही अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत हातमिळवणी करत मदतीचे कार्य सुरु केले आहे.
कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. नुकतेच यशराज फिल्म्सने चित्रपटसृष्टीतील कामगारवर्गाची लसीकरण करून देण्याची जबादारी उचलण्याची तयारी राज्य सरकारला कळवली आहे. आणि जेव्हा लस प्राप्त होईल तेव्हा वैद्यकीय साहाय्याने सर्व कामगारांचे लसीकरण करण्याचे आखले जात आहे. त्यांनी अजून एक पाऊल पुढे जात यश चोपडा फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना ५००० थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले असून ते कार्य सुरु झाले आहे.
तसेच युथ फीड इंडिया या एनजीओच्या साहाय्याने ते ४ जणांच्या गरजू कुटुंबाला एका महिन्याचे रेशन किट वाटप करण्यात येणार आहे. Https://yashchoprafoundation.org वर ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे, गरजू लोकांना ‘वायआरएफ’ कडे त्वरित अर्ज करता येईल. कृपया हा संदेश क्रू मेंबर्स, लाइटमेन, स्पॉटबॉय, इलेक्ट्रिशियन, सुतार, चित्रकार, कनिष्ठ कलाकार आणि ज्यांना मदतीची गरज भासू शकेल अशा सर्वांना पाठविण्याची विनंती यशराज फिल्म्सने केली आहे.