मुंबई - मुंबईच्या कलिनाजवळील कुची कर्वेनगर या झोपडपट्टी भागात राहाणाऱ्या ११ वर्षीय मुलाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सनी पवार असं या मुलाचं नाव आहे. सनीने १९ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोतकृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार पटकवला आहे.
'चिप्पा' या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. सनीने 'चिप्पा'शिवाय २०१६ मध्ये आलेल्या 'लायन' चित्रपटातही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेविस यांनी केले होते.
'चिप्पा'साठी मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बोलताना सनी म्हणाला, मला खूप आनंद झाला आहे. हे सगळं केवळ माझ्या पालकांमुळे शक्य झाले आहे. माझ्या कुटुंबीयांना माझा अभिमान वाटावा यासाठी मला रजनिकांत यांच्यासारखंच मोठा अभिनेता बनायचं आहे. मला हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायचं असल्याचं त्यानं यावेळी म्हटलं आहे.