मुंबई - अभिनेता विवेक ओबेरॉयचा मोदींच्या जीवनावरील चित्रपट निवडणूकीच्या काळात प्रदर्शित होऊ शकला नाही. २४ मे'ला हा चित्रपट रिलीज होणार अशी चर्चा आहे. बायोपिक तर रिलीज होईल पण त्याचा राजकीय फायदा मोदी यांना निवडणूकीत होणार नाही. याची खंत भाजपसह विवेक ओबेरॉयला होती. आता या निवडणूकीत विवेक नवी भूमिका साकारणार आहे.
विवेक ओबेरॉयचे नाव भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ठ करण्यात आलंय. गुजरातमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या पुढील टप्प्यावरील निवडणुकीत तो प्रचारक म्हणून काम करेल. स्टार प्रचारकांमध्ये हेमा मालिनी, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज यांच्यासह स्वतः नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत ४० व्या स्थानी विवेक ओबेरॉय यांचे नाव आहे.
मोदींच्या बायोपिकमधून जी गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडू शकली नव्हती ती साध्य करण्याचा प्रयत्न विवेक या माध्यमातून करेल. बायोपिकमध्ये त्याने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती. शूटींगच्या काळात मोदी होऊन सेटवर वावरलेला विवेक आता मोदींच्या प्रचारात उतरणार आहे. मोदींच्या प्रचारासाठी पडद्यावरचे मोदी अवतरणार असल्याची चर्चा आता मतदारांमध्ये पाहायला मिळेल.