मुंबई - 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेला विकी कौशल लवकरच स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. स्वातंत्र्यसैनिक उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये विकी मुख्य भूमिका साकारणार आहे. 'सरदार उधम सिंग', असे या बायोपिकचे नाव आहे. या चित्रपटातील विकीचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
दिग्दर्शक सुजित सरकार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. १९१९ मध्ये घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर उधम सिंग यांनी मिशेल ओडवायर या ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या केली होती. याच घटनेवर आधारित हा चित्रपट असणार आहे.
या चित्रपटाची कथा रितेश शाह आणि शुभनेंदु भट्टाचार्य यांनी लिहिली आहे. रॉनी लाहिरी, शिल कुमार आणि रायझिंग सन प्रॉडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे शूटिंग शेड्युल रशिया, लंडन, जर्मनी आणि भारतात पूर्ण होणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा पहिला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.